ए. एस. ट्रेडर्सचा फरार संचालक पोलिसांत

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोट्यवधीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा फरारी संशयित संचालक महेश बळवंत शेवाळे (वय 40) हा शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. 22) पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित शेवाळे याच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबवली. कंपनीच्या पैशांतून खरेदी केलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यात येत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तथा तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी सांगितले. फरारी काळात संशयिताला आश्रय देणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कमी काळात दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने ए. एस. ट्रेडर्सच्या प्रमुखांसह संचालक, एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. कंपनीचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदार याच्यासह संचालक, एजंटांसह 32 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
संशयित महेश शेवाळे याच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू असतानाच त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. मात्र, शुक्रवारी तो स्वत:हून हजर झाला. चौकशीसाठी तपासाधिकार्यांनी शनिवारी दिवसभर त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. फरारी काळात त्याने कोणाकडे आश्रय घेतला, याचीही त्याच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
Latest Marathi News ए. एस. ट्रेडर्सचा फरार संचालक पोलिसांत Brought to You By : Bharat Live News Media.
