सेन्सेक्स २५९ अंकांनी घसरला, निफ्टी २१,६०० च्या खाली, आज नेमकं काय घडलं?

Bharat Live News Media ऑनलाईन : शेअर बाजारातील अस्थिर वातावरणात आज शनिवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून बंद झाले. बँकिंग क्षेत्रात खरेदी राहिली. तर आयटी क्षेत्रावर दबाव राहिला. बाजारात आज काही प्रमाणात विक्री दिसून आली. सुरुवातीला तेजीत खुला झालेला सेन्सेक्स २५९ अंकांच्या घसरणीसह ७१,४२३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० अंकांनी घसरून २१,५७१ वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर बँक, मेटल, पॉवर निर्देशांक ०.५-१ टक्क्यांनी वाढले, तर एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि रियल्टी ०.४-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. (Stock Market Closing Bell)
सेन्सेक्स आज ७२ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर सेन्सेक्स ७१,४०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरून २,४७० रुपयांपर्यंत खाली आला. टीसीएस, इंडसइंड बँक, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक हे शेअर्सही घसरले. तर कोटक बँक पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर्स वाढले.
निफ्टीवर हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, इंडसइंड बँक, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले. तर कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले.
कोटक बॅंक शेअर्स टॉप गेनर
कोटक बँकेचा शेअर्स आज बीएसईवर ३ टक्क्यांनी वाढून १,८१९ रुपयांवर गेला. कोटक महिंद्रा बँकेने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा जवळपास ८ टक्क्यांच्या वार्षिक (YoY) वाढीसह ३,००५ कोटी रुपयांवर गेला. या पार्श्वभूमीवर हा शेअर्स वधारला.
IDBI Bank शेअर्सची उसळी
डिसेंबर तिमाहीच्या कमाईनंतर आयडीबीआय बँकेचे शेअर्स आज ११ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ७७.८० रुपयांवर पोहोचले. IDBI Bank ने डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक ५७.३ टक्क्यांची वाढ नोंदवली तो १,४५८.२० कोटी रुपये झाला आहे. (Shares of IDBI Bank)
पेटीएमचे शेअर्स वधारले
फिनटेक प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications चे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात एनएसई (NSE) वर सुमारे ३ टक्क्यांनी वाढून ७९८ रुपयांवर पोहोचले. कारण कंपनीने डिसेंबर तिमाहीच्या महसुलात वाढ नोंदवल्याने त्यांचा तोटा कमी झाला. दुपारच्या सत्रात हा शेअर्स २ टक्क्यांनी घसरून ७८८ रुपयांवर होता. गेल्या तीन दिवसांपासून हा शेअर्स तेजीत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने त्यांचे नुकसान २२० कोटी रुपयांपर्यंत कमी केले, जे सप्टेंबरच्या तिमाहीत २९० कोटी रुपये आणि मागील वर्षीच्या तिमाहीत ३९२ कोटी रुपये होते. (Paytm shares)
शेअर बाजारात आठवड्यातील केवळ पाच दिवस ट्रेडिंग सुरु असते. सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या दिवसात शेअर बाजारात व्यवहार चालतात. पण, आज २० जानेवारी सुट्टीच्या दिवशीही शेअर बाजार खुला राहिला. अनपेक्षित डिझास्टर हाताळण्याच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी आज विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले होते. (Stock Market Closing Bell)
हे ही वाचा :
हवी जोखीमरहीत गुंतवणूक
वेध शेअर बाजाराचा : तेजीच्या उंबरठ्यावर भारत
2024 सालात कोठे गुंतवणूक कराल?
Latest Marathi News सेन्सेक्स २५९ अंकांनी घसरला, निफ्टी २१,६०० च्या खाली, आज नेमकं काय घडलं? Brought to You By : Bharat Live News Media.
