परराज्यातील शेतकर्यांना कृषिकचे आकर्षण..

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या जागतिक दर्जाच्या कृषिक प्रदर्शनाला दुसर्या दिवशी तेलंगण, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू राज्यातील शेतकर्यांनी आवर्जून भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील तसेच राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनीही शुक्रवारी (दि. 19) या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नाबार्ड तसेच काही खासगी कंपन्या यांच्या सहकार्यातून होत आहे. या प्रदर्शनामध्ये 150 पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल आहेत.
भाजीपाला पिकांबाबत असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचबरोबर फुलशेतीमध्ये आलेले विविध नवीन वाण व लागवड पद्धती, त्याचे नियोजन, याबाबतची माहिती घेण्याकडे शेतकर्यांचा कल जाणवला. बेळगावच्या सुभाष मोदगे यांनी मत्स्यशेतीविषयी माहिती अधिक आवडल्याचे सांगितले, तर धाराशीवच्या नेताजी शिंदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत केलेला प्रयोग नावीन्यपूर्ण असल्याचे सांगितले. ऊसपिकांमधील असलेल्या विविध प्रजाती व त्याची लागवड पद्धती, त्यासाठी वापरलेले ठिबकचे तंत्रज्ञान व खतपद्धती, चायनीज पद्धतीने केलेली मका लागवड, पांढरा झेंडू, भाजीपाल्याचे विविध प्रकार, याची माहिती शेतकरी उत्सुकतेने घेताना दिसले. कमी खर्चातील शेती मशागत अवजारे, औषध फवारणी अवजारे याचीदेखील माहिती शेतकरी घेत होते.
या प्रदर्शनामध्ये 20 व 21 जानेवारीदरम्यान डॉ. आप्पासाहेब पवार अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये मारवारी आणि भीमथडी देखणे, उत्तम प्रतीचे अश्व प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी दररोज होलस्टेन फ्रिजियन गायीचे दूध उत्पादन स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. शेतकरी त्यात गायींसह सहभागी होत आहेत. अखेरच्या दोन दिवसांत प्रदर्शनाला होणारी गर्दी वाढेल, हे लक्षात घेत ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी शुक्रवारी नियोजन केले.
हेही वाचा
आमदार दत्तात्रय भरणेंनी जाणल्या प्रवाशांच्या समस्या
कोल्हापूर : थेट पाईपलाईनला मांगोली येथे मोठी गळती
मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यात जय बाबाजी परिवाराचा सहभाग
Latest Marathi News परराज्यातील शेतकर्यांना कृषिकचे आकर्षण.. Brought to You By : Bharat Live News Media.
