अँटिबायोटिक औषधांच्या अंमलबजावणीबाबत अनिश्चितता..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालयांतील आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांना प्रतिजैविक औषधे (अँटिबायोटिक) लिहून देताना सबळ कारण द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. प्रतिजैविकांच्या अतिवापराने औषधांचा परिणाम शून्य होणे ही धोक्याची घंटा आहे. अँटिबायोटिक ही ’सायलंट किलर’ ठरत आहेत. वारंवार प्रतिजैविके घेतल्याने जिवाणूंची प्रतिकारशक्ती वाढते आणि औषधांचा परिणाम कमी होत जातो.
प्रतिजैविकांचा यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे तसेच ह्रदयावर विपरीत आणि दीर्घकालीन परिणाम होतात. याबाबत ठोस पावले उचलली न गेल्यास प्रतिजैविकांचा अतिवापर हा भविष्यातील महामारी ठरेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांना रुग्णांना अँटिबायोटिक लिहिलेली चिठ्ठी का दिली, याचे कारणही देणे अनिवार्य करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्रेत्यांनी रुग्णांना औषधे देण्यास मनाई असतानाही या नियमांचे बहुतांश वेळा पालन होत नाही.
कारण, कायद्याची अंमलबजावणीची देखरेख करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही. याप्रमाणे डॉक्टर अंँटिबायोटिक लिहून देताना दर वेळी सबळ कारण देतील की नाही, यावर कोणाचे नियंत्रण राहणार, हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे. कोरोना काळात अँटिबायोटिक्सचा प्रचंड वापर झाला. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. बॅक्टेरिया शरीरात कायम असतात, प्रतिकारशक्ती कमी झाली की डोके वर काढतात. विषाणूंना अँटिबायोटिक लागू पडत नाहीत. डॉक्टरांचा अँटिबायोटिक देण्याकडे वाढलेला कल, अतिवापरच्या दुष्परिणामांबाबत असलेली अनभिज्ञता, यामुळे धोका वाढत आहे, याकडेही वैद्यकतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
फ्लूसद़ृश आजारांची लक्षणे बरेचदा एकसारखी असतात. त्यामुळे आजाराचे निदान होईपर्यंत रुग्णाला बरे वाटावे, आराम मिळावा, यासाठी अँटिबायोटिक औषधांना प्राधान्य दिले जाते. रुग्णाच्या आजाराचे निदान होईपर्यंत त्याला कोणते उपचार द्यावेत, याबाबत अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे.
– डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन
अडचण काय?
केमिस्ट प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करीत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. मात्र, एफडीएचे औषध विक्रेत्यांवर सातत्याने लक्ष असते. औषध विक्रेत्यांकडे किमान औषध विक्रीची नोंद असते. परंतु, नॉन-अॅलोपॅथिक डॉक्टरांसाठी कोणतीही देखरेख यंत्रणा नाही.
हेही वाचा
पाकिस्तानला हिसका
मोदींनी थोपटली मुख्यमंत्री शिंदेंची पाठ
दशावतारी प्रभावळीतील रामलल्लाचे दूरदर्शन
Latest Marathi News अँटिबायोटिक औषधांच्या अंमलबजावणीबाबत अनिश्चितता.. Brought to You By : Bharat Live News Media.
