‘निती आयोगाची माहिती म्हणजे २५ कोटी लोकांना मिळणारी मदत नाकारण्याचा मोदी सरकारचा डाव’

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील २५ कोटी लोक गरिबीच्या बाहेर आली, ही निती आयोगाची माहिती म्हणजे मोदी सरकारचा नवा जुमला आहे. २५ कोटी लोकांना सरकारच्या सुरक्षेच्या जाळ्यातून बाहेर काढणे आणि त्यांना मिळणारी मदत नाकारण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने लोक खरोखरच गरिबीतून बाहेर आले असतील तर देशात आजही ८० कोटी लोकांना मोफत धान्य का द्यावे लागते, असा प्रश्नही काँग्रेसने विचारला. दोन दिवसांपूर्वीच निती आयोगाने २५ कोटी लोक बहुआयामी गरिबीच्या बाहेर आल्याचे सांगितले होते.
२४.८२ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आल्याचे निती आयोगाने सांगितले होते. जर खरोखर गरिबी कमी झाली असेल तर लोक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू का घेत नाहीत, सरकारला अजूनही ८० कोटी भारतीयांना मोफत अन्न देण्याची गरज का पडते, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी विचारला. काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निती आयोगाच्या अहवालाला जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या कोणत्याही संस्थेने समर्थन दिलेले नाही. केवळ सर्वेक्षण करुन अहवाल तयार करणे आणि मोदी सरकारला मोठे दावे करण्यासाठी मदत करणे यासाठी निती आयोगाने हे केले आहे. जेव्हा काँग्रेसप्रणित सरकारने २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले तेव्हा तो अहवाल जागतिक बँकेने मान्य केला होता, असेही त्या म्हणाल्या.
नीती आयोगाने गरिबीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्थापित निकष बदलले आहेत, ज्या कुटुंबाकडे केवळ शौचालय आहे ते गरिबीबाहेर आहेत, एखाद्या गावात पाच कुटुंबांना वीज जोडणी असल्यास, संपूर्ण गाव विद्युतीकृत आहे असे समजले गेले आणि गाव गरीबीमुक्त मानले गेले, असे निकष लावण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :
EVM VVPAT : निवडणूक आयोगाकडून इव्हीम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती मोहीम
Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली
Nagpur news: गडकरींचा खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आजपासून
Latest Marathi News ‘निती आयोगाची माहिती म्हणजे २५ कोटी लोकांना मिळणारी मदत नाकारण्याचा मोदी सरकारचा डाव’ Brought to You By : Bharat Live News Media.
