धुळेकरांसाठी आनंदाची बातमी, २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार : खासदार सुभाष भामरे

धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे ग्रामीण मतदारसंघातील बोरी नदी पट्ट्यातील काही गावांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. वर्षानुवर्षे असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठीच आपण लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. यातूनच धुळे व शिंदखेडा तालुक्यांसाठी वरदान ठरणारी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिचन योजना पूर्णत्वास येत आहे. वर्षभरातानंतर या योजनेद्वारे धुळे तालुक्यातील १०० व शिंदखेडा तालुक्यातील १०० अशा २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याचे दिवस संपणार आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बारमाही तापी नदीचे पाणी उपलब्ध होणार असून, तालुका सुजलाम-सुफलाम होईल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याच्या अनुषंगाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे धुळे तालुक्यातील मांडळ, नंदाळे, अंचाळे, मोरदड या बोरी पट्ट्यातील गावांत स्वागत झाले, त्यावेळी खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते या गावांतील लाभांपासून वंचित लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. डॉ. भामरे म्हणाले, की खासदार म्हणून प्रतिनिधित्व करताना आपणही लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण व बागलाण या सहाही मतदारसंघांतील गावागावांतील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधींचा निधी देत कामे मार्गी लावली आहेत. त्याच प्रमाणे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी बारमाही पाणी मिळावे म्हणून अनेक दशकांपासून प्रलंबित सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी पाठपुरावा केला. पंतप्रधान मोदी यांच्याकडून योजनेसाठी विशेष पॅकेजअंतर्गत २५०० कोटी रुपयांचा निधी आणून काम सुरू केले. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, ते ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे. वर्ष-दीड वर्षात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जामफळ धरणातून तापीचे पाणी पोहोचल आणि तालुका सुजलाम-सुफलाम होईल.
उद्योगांची लवकरच भरभराट
खासदार डॉ. भामरे म्हणाले की, उद्योग-व्यवसायांसाठी आवश्यक महामार्ग, रेल्वे आणि मुबलक पाण्यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांची पूर्ती करण्यात तुमचा खासदार म्हणून यश आले आहे. जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाले असून, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे कामही आठवडाभरात सुरू होत आहे. तसेच जामफळ धरणाचे कामही वर्षभरात पूर्ण होणार असल्याने येत्या दोन-तीन वर्षांत धुळे शहर व नरडाणा औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक उद्योगांची भरभराट होणार असून, यातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या हातांनाही काम उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
Latest Marathi News धुळेकरांसाठी आनंदाची बातमी, २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार : खासदार सुभाष भामरे Brought to You By : Bharat Live News Media.
