पाकिस्तानने इराणवर केलेल्या हल्ल्यात ७ ठार
Bharat Live News Media ऑनलाईन : पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल इराणवर केलेल्या हल्ल्यात किमान ७ लोक ठार झाल्याचे वृत्त इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिले आहे. इराणच्या आग्नेय सीमेजवळ किमान ७ लोक ठार झाल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे. इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील ग्रीन माऊंटन भागातील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने इराणच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. बलुचिस्तान प्रांतात इराणने केलेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे. (Pakistan-Iran border tensions)
एपीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानाने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात ७ ठार झाले असून त्यात ४ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने इराणच्या सरकारी टेलिव्हिजनशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानने बुधवारी त्यांच्या भूभागावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याबद्दल इराणचा निषेध केला. इराणच्या या हल्ल्यात बलुचिस्तानमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले होते. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला त्याच्या सार्वभौमत्वाचे आणि हवाई क्षेत्राचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पाकिस्तानने दिला होता. त्यानंतर आज पाकिस्तानने इराणच्या आग्नेय सीमेजवळ एअरस्ट्राइक केला.
“आज सकाळी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-ओ-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले सुरु केले. गुप्तचर-आधारित ‘ ऑपरेशन मार्ग बार सरमचार’ दरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या डेप्युटी गव्हर्नर जनरलच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी इराणच्या आग्नेय भागातील सारवान शहर स्फोटांच्या मालिकेने हादरले. या अधिकाऱ्याने सरकारी आयआरएनए या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या स्फोटात सात अनिवासी इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामागील कारण निश्चित शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
पाकिस्तानी गुप्तचर सूत्राने रॉयटर्स वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले की, या हल्ल्यांमध्ये इराणमधील बलोच दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचा संदर्भ देत गुप्तचर अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “या हल्ल्यात लक्ष्य केलेले अतिरेकी बीएलएफचे आहेत.”
पाकमध्ये हवाई हल्ला केल्याचे वृत्त मंगळवारी मध्यरात्री इराणच्या ‘इर्ना’ या सरकारी माध्यम संस्थेने आपल्या पोर्टलवर दिले; पण नंतर काही वेळाने ते काढून टाकले. अर्थात, तत्पूर्वी ही बातमी जगभर पसरली होती. दरम्यान, इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले असून, त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. इराणच्या राजदूतालाही पाकने समन्स बजावले असून, आपल्या संतप्त भावना कळविल्या आहेत. दुसरीकडे, ‘तस्नीम’ या इराणमधील वृत्तसंस्थेने आपल्या संकेतस्थळावर पाकिस्तानवरील हल्ल्याची बातमी दिली आहे.
Pakistani airstrikes on Iran killed 4 children and 3 women, a local official tells Iranian state television, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2024
Latest Marathi News पाकिस्तानने इराणवर केलेल्या हल्ल्यात ७ ठार Brought to You By : Bharat Live News Media.