महापालिकेसह रुग्णाकडूनही उकळले पैसे : महापालिका करणार चौकशी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील एका नामांकित हॉस्पिटलने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाकडूनही आणि शहरी गरीब योजनेंतर्गत महापालिकेकडूनही उपचाराचा खर्च उकळल्याचा आरोप राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले आहे.
महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून 1 लाखांपर्यंतचे उपचार केले जातात. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दोन लाख रुपये उपचारासाठी देण्यात येत असतात. यासाठी महापालिका प्रत्येक वर्षाला सुमारे 60 कोटी रुपये खर्च करत असते.
अरण्यश्वर परिसरात राहणारी एक महिला एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. रुग्ण दाखल झाल्यानंतर संबंधीत महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कार्ड काढले. कार्ड काढण्यासाठी चार पाच दिवसाचा कालावधी गेला. उपचाराचे बील 86 हजार झाल्यानंतर रुग्णाकडून त्याचे पैसे घेण्यात आले.
त्यानंतर हॉस्पिटलने महापालिकेकडूनही 80 हजार रुपये शहरी गरीब योजनेंतर्गत घेतले. संबंधीत महिलेला पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुन्हा त्यांना उपचारासाठी त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी महापालिकेकडे शहरी गरीब योजनेंतर्गत किती रक्कम शिल्लक आहे, याची चौकशी केली. यामध्ये संबंधीत हॉस्पिटलने पहिल्या उपचारापोटी रुग्णाकडून आणि महापालिकेकडूनही बीलाचे पैसे घेतल्याचे उजेडात आले. याबाबत कदम यांनी कागदपत्रांसह आरोग्य विभागाकडे तक्रार केली असून संबंधीत हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संबंधीत हॉस्पिटलने रुग्णाकडून आणि महापालिकेकडूनही एकाच उपचारासाठी बील घेतल्याची तक्रार आली आहे. या अनुषंगाने डॉ. मनिषा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
– डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.
हेही वाचा
बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी : आम्ही जगायचं कसं?; नागरीकांचा सवाल
CET Exam 2024 : सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर
Nandurbar Blast : झोपडीत झालेल्या स्फोटाने नंदुरबार हादरले
Latest Marathi News महापालिकेसह रुग्णाकडूनही उकळले पैसे : महापालिका करणार चौकशी Brought to You By : Bharat Live News Media.