छत्तीसगड पुनर्प्राप्तीसाठी भाजपचे सर्वस्व पणाला…

छत्तीसगड पुनर्प्राप्तीसाठी भाजपचे सर्वस्व पणाला…

स्मिता शर्मा

सलग पंधरा वर्षे छत्तीसगडवर राज्य केलेल्या भाजपला 2018 सालच्या निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखता आला नव्हता. गत पाच वर्षांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर ‘महादेव अ‍ॅप’ चालविणार्‍यांकडून 508 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांनी या मुद्द्यावरून बघेल यांच्यासह काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, लाचखोरीसह महादेव अ‍ॅप हा भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे.
छत्तीसगड विधानसभेच्या 20 जागांसाठी गेल्या आठवड्यात मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष दुसर्‍या टप्प्यातील मतदानाकडे लागले आहे. दुसर्‍या टप्प्यात येत्या 17 तारखेला 70 जागांसाठी मतदान होणार असल्याने हा टप्पा सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. राज्यात भाजपकडून झंझावाती प्रचार सुरू आहे. खुद्द पंतप्रधान मोदी काँग्रेसवर प्रखर हल्ले चढवित आहेत. तत्कालीन वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात छत्तीसगडची निर्मिती झाली होती आणि भाजपच या राज्याला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास मोदी राज्यातील जनतेला देत आहेत. ‘महादेव अ‍ॅप’च्या चालकांकडून बघेल यांना देण्यात आलेल्या कथित लाचेचा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे. तर काँग्रेसकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बघेल यांना अडकविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. ‘महादेव अ‍ॅप’ मुद्द्याचा काँग्रेसला निवडणुकीत कितपत फटका बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफतच्या योजना जाहीर करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे की काय, अशी स्थिती आहे. मोफतच्या योजनांची घोषणा जशी मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणासाठी करण्यात आली आहे, तशी ती छत्तीसगडसाठीही विविध पक्षांनी केली आहे. काँग्रेसने गतवेळीप्रमाणे याहीवेळी मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या प्रमुख आश्वासनासह 3200 रुपये प्रति क्विंटल या दराने भाताची खरेदी, 200 युनिटपर्यंत मोफत वीज, सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांत ‘केजी ते पीजी’पर्यंत मोफत शिक्षण, भूमीहीन लोकांना वर्षाला 10 हजार रुपयांची मदत, गॅस सिलिंडरवर 500 रुपयांची सबसिडी, गरीब लोकांना घरे देणे आदी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. विशेष म्हणजे अलिकडील काळात चर्चेत आलेल्या जातनिहाय जनगणनेचा उल्लेख करीत काँग्रेसने राज्यात अशी जनगणना केली जाईल, असेही सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांचा पुतण्या भाजप उमेदवार
‘शहेनशहा’ चित्रपटातील ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं’ या डॉयलॉगची मोठी चर्चा आहे. निवडणुकीच्या धामधुमीत पाटण मतदारसंघातील रस्सीखेचबद्दल विचारले असता मुख्यमंत्री बघेल यांनी ‘रिश्ते में तो हम उनके बाप लगते है’ हा डॉयलॉग मारून सर्वांचे लक्ष वेधले. पाटण मतदारसंघात स्वत: बघेल निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे विजय बघेल भाजपकडून लढत देत आहेत. काका-पुतण्याच्या संघर्षात कोण बाजी मारणार, याची उत्कंठा सर्वांनाच आहे. विजय बघेल हे सध्या दुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दीर्घकाळापासून काका-पुतण्यामध्ये राजकीय द्वंद आहे. याआधी 2008 आणि 2013 ला या दोघांचा मुकाबला झाला होता. 2008 मध्ये विजय यांनी विजय मिळवला होता, तर 2013 च्या निवडणुकीत भूपेन यांनी बाजी मारली होती.

The post छत्तीसगड पुनर्प्राप्तीसाठी भाजपचे सर्वस्व पणाला… appeared first on पुढारी.

सलग पंधरा वर्षे छत्तीसगडवर राज्य केलेल्या भाजपला 2018 सालच्या निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखता आला नव्हता. गत पाच वर्षांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर ‘महादेव अ‍ॅप’ चालविणार्‍यांकडून 508 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांनी या मुद्द्यावरून बघेल यांच्यासह …

The post छत्तीसगड पुनर्प्राप्तीसाठी भाजपचे सर्वस्व पणाला… appeared first on पुढारी.

Go to Source