तडका : भांड्याला भांडे लागणार..!

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक पुरातन म्हण आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तरीही उठसूट कोणत्याही कारणावरून न्यायालयाचे दार ठोठावण्याची नवीनच पद्धत आलेली आहे. संसार आहे म्हटल्यानंतर चार लोक एकत्र येणार, भांड्याला भांडे लागणार हे ठरलेले आहे. त्यात पुन्हा नवरा-बायकोची भांडणे असतील तर बहुतांश मराठी संसार भांडत भांडतच प्रगती करत असतात.
नुकत्याच घटनेत एका विवाहित महिलेने आपल्या सासरच्या लोकांविरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. घटना राज्यातील एका जिल्ह्यात घडलेली आहे. सासू, सासरे आणि दीर या सूनबाईला स्वयंपाक येत नाही म्हणून सतत टोमणे मारायचे. तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या आई-वडिलांनी तुला काही शिकवले नाही, असा काहीसा त्यांचा सूर असायचा. नसेल एखाद्या सुनेला किंवा नवविवाहितेला स्वयंपाक येत तर हा कुठे मोठा अपराध असतो का? आजकाल करिअरच्या मुली असल्यामुळे त्यांना स्वयंपाक शिकण्यास वेळ नसतो आणि तशात लग्न होऊन ती सासरी गेली की पुढच्या दोन-तीन महिन्यांत सासरच्या लोकांना लक्षात येते की, हिला स्वयंपाक येत नाही.
सासरच्या लोकांमध्ये, विशेषत्वाने सुनेचा जास्त संबंध येतो तो सासूबरोबर. तर हे सासूबाई, सासरे आणि दीर तिला सतत टोमणे मारायचे की, तुला स्वयंपाक येत नाही. यर विवाहितेने थेट न्यायालयात धाव घेतली आणि हे टोमणे मारणे म्हणजे कौटुंबिक हिंसा आहे, असा दावा केला. यावरून तिने सासरच्या लोकांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला. दरम्यान आरोपी दिराने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि टोमणे मारणे ही हिंसा होत नाही,असा युक्तिवाद केला, जो न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे आता सासरच्या लोकांना नवीन सूनबाईंना टोमणे मारण्याचा परवानाच मिळाला आहे.
पण आम्ही काय म्हणतो की, घरामध्ये स्वयंपाकघर हवेच कशाला? स्वयंपाकघर हेच तर वादाचे मुख्य केंद्र असते, कारण या ठिकाणी दोन तेजस्वी महिला एकमेकींना भिडत असतात. खडाखडी, चकमकी आणि वेळप्रसंग आला तर धोबीपछाड असे सगळे डाव त्या स्वयंपाकघरात सुरू असतात. नुकतीच पुण्यातील एका आघाडीच्या इंटिरियर डेकोरेटर यांची भेट झाली. त्यांनी एक धक्कादायक बातमी दिली की, काही क्षण आम्हीही गडबडून गेलो आणि आम्हाला लगेच भारतीय संस्कृतीची काळजी वाटायला लागली. नुकतेच त्यांनी एका घराचे इंटिरियर केलेले आहे, ज्या घरामध्ये किचनच नाहीये.
घरी स्वयंपाक करण्याच्या बाबत आजकाल करिअर ओरिएंटेड मुलींचा कल नसतो. तेवढा वेळही त्यांना नसतो. आवड असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. सोमवार ते शुक्रवार नवरा-बायको दोघेही सकाळी निघतात आणि थेट संध्याकाळी घरी पोहोचतात. दुपारचे जेवण कंपनीमध्ये असते. संध्याकाळी बाहेर भेटून ते हॉटेलमध्ये एकत्र जेवण करतात आणि घरी परत येतात. सकाळी उठल्याबरोबर चहा-कॉफी करण्यासाठीचे मशिन असते. त्यासाठी डिस्पोजेबल ग्लास वापरले जातात. शनिवार-रविवार सुट्टी असते तेव्हा हे काय करतात? नवीन पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते जल्लोष करत असतात.
Latest Marathi News तडका : भांड्याला भांडे लागणार..! Brought to You By : Bharat Live News Media.
