देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एकाच नकाशावर

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एका नकाशावर आणण्याची किमया भूगोलतज्ज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी साधली आहे. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे भूगोल दिनानिमित्त देशातील प्रमुख श्रीराम मंदिरांच्या नकाशाचे लोकार्पण करण्यात आले.
या नकाशात अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिर, रामटेक येथील श्रीराम मंदिर त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर येथील रघुनाथ मंदिर, मध्य प्रदेशातील ओरछा येथील राम राजा मंदिर, कर्नाटकातील चिकमंगळूर येथील कोदंड राम मंदिर, केरळ येथील त्रिशूरमधील त्रिपायर श्रीराम मंदिर, आंध्र प्रदेशच्या हैदराबाद येथील सीता रामचंद्र स्वामी मंदिर, ओडिशा येथील भुवनेश्वर राम मंदिर या निवडक श्रीराम मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांच्या हस्ते या नकाशाबरोबरच भूगोल संदेश देणार्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. डॉ. गरसोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नकाशानिर्मितीची प्रक्रिया उलगडली.
Latest Marathi News देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एकाच नकाशावर Brought to You By : Bharat Live News Media.
