Leopard News : शाळेच्या वाटेवर ‘तो’ दबा धरून बसलेला असतो.
आशिष देशमुख
पुणे : सायंकाळ होताच तो ओढ्याजवळ दबा धरून बसलेला असतो. गुरे, शेळ्या निघाल्या की, त्यांच्यावर तो विद्युत चपळाईने झडपच घालतो, ही आपबिती सांगत होते जुन्नर गावातील विद्यार्थी अन् ग्रामस्थ. या प्रतिनिधीला त्यांनी बिबट्याची संपूर्ण दिनचर्या अन् त्याच्या सवयींचे बारकावे सांगितले. जुन्नर,खेड तालुक्यांसह आजूबाजूच्या गावातील ही आता रोजचीच दिनचर्या आहे. या भागातील नागरिकांनी या प्रतिनिधीला आपबिती सांगितली. आजवर केलेले हल्ले अन् त्याच्या दहशतीचे अनेक घटना सांगितल्या. ते म्हणाले,संध्याकाळी पाचपासून बिबट्यांची दहशत सुरू होते, ती पहाटे पाचपर्यंत असते. जसा सूर्य उगवतो तसा बिबट्या गावातून गायब होतो.
त्याचे दर्शन नित्याचेच, तो घराजवळच असतो
शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व गावातील महिलांनी सांगितले की, बिबट्या अगदी दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो कधी जनावरांवर हल्ला करेल याची शाश्वती नाही.आम्ही रोजच शेतात काम करतो, त्या वेळी देखील सतत तो कुठून-कधी येईल अशी हुरहुर भीती अन् दहशत असते. त्याची दहशत इतकी वाढली आहे की, आम्हाला आता शेतात काम करणे अवघड झाले आहे. दिवसाही तो अनेक वेळा शेतात रस्त्यावर झाडीत नदीकाठी दिसतो. मात्र, हल्ला करण्याची वेळ प्रामुख्याने पहाटे आणि सायंकाळी पाचनंतरची आहे. दिवे लागणीच्या वेळेस तो येतो तेव्हा जनावरे कोंबड्या, मांजरं, कुत्री, वासर, शेळ्यांच्या हालचालींवर टपून बसलेला असतो.
तीन तालुक्यांना 100 बिबट्यांनी वेढले
जुन्नर येथील पाडळी (कबाडवाडी) परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. या ठिकाणी उपसरपंच माजी उपसरपंच अरुण प्रल्हाद पापडे यांची भेट झाली त्यांनी सांगितले की, आजवर मी अनेक बिबट्यांना पाहिले. जुन्नर,खेड व आंबेगाव परिसरात या भागामध्ये किमान शंभर ते दीडशे बिबटे असावेत. मात्र, या बिबट्यांची गणना झाली नसल्याने या संख्येचा अंदाज लावणे कठीण आहे. ग्रामस्थ म्हणतात, बिबट्यामुळे मुले शाळेत जाताना काळजी वाटते. कारण संध्याकाळी येताना बिबट्या त्यांच्यावर कधी हल्ला करेल याचा नेम नाही. धावत्या वाहनांवर तो हल्ला करतो मग पायी जाणारे म्हणजे सहज सावज आहे.
आमच्या गावातून शाळा किमान तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. आई-वडील शेतावर असतात.त्यामुळे घरून पायीच जावे लागते. गावातून एसटीची सोय नाही. वाहने थांबत नाहीत. मग आम्ही समूहाने पायीच शाळेत जातो. बर्याच वेळा बिबट्या दिसतो तेव्हा आम्ही पुन्हा शाळेच्या दिशेने पळतो. त्यामुळे सायंकाळी आम्ही पायी फिरत नाही. आमच्या अनेक मित्रांवर बिबट्याने हल्ला केला आहे. सुदैवाने सर्व मित्र वाचले पण ते गंभीर जखमी झाले होते.
– सुजल पापडे, अर्जुन पवार – विद्यार्थी.
शेतात काम करताना आम्हाला सतत भीती अन् हुरहुर वाटते. गाव सोडून जाणार कसे आणि कुठे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. वन्यजीव अधिकारी सांगतात वाकून काम करू नका, पण शेतात वाकूनच काम करावे लागते. बिबट्याला आम्ही रोजच पाहतो. तो सतत घराजवळ दिसतो. आजवर त्याला शेकडो वेळा पाहिले आहे.आमच्यातील अनेकांवर त्याने हल्ले केले गंभीर जखमी केले बाजूच्या गावात तर मुलांना खाऊन टाकले. मुलं शाळेत जातात तेव्हा ते परत येतील की नाही अशी भीती सतत वाटू लागली आहे.
– चेतना पापडे, आशा पापडे – शेतकरी.
हेही वाचा
आरक्षणाबाबत शास्त्रोक्त अभ्यास आवश्यक : युवराज छत्रपती संभाजी राजे
जिल्ह्यात पंधरा दिवसांत केवळ 2 लाख टन ऊस गाळप
टेकइन्फो : ‘डीप फेक’चे मायाजाल
The post Leopard News : शाळेच्या वाटेवर ‘तो’ दबा धरून बसलेला असतो. appeared first on पुढारी.
पुणे : सायंकाळ होताच तो ओढ्याजवळ दबा धरून बसलेला असतो. गुरे, शेळ्या निघाल्या की, त्यांच्यावर तो विद्युत चपळाईने झडपच घालतो, ही आपबिती सांगत होते जुन्नर गावातील विद्यार्थी अन् ग्रामस्थ. या प्रतिनिधीला त्यांनी बिबट्याची संपूर्ण दिनचर्या अन् त्याच्या सवयींचे बारकावे सांगितले. जुन्नर,खेड तालुक्यांसह आजूबाजूच्या गावातील ही आता रोजचीच दिनचर्या आहे. या भागातील नागरिकांनी या प्रतिनिधीला आपबिती …
The post Leopard News : शाळेच्या वाटेवर ‘तो’ दबा धरून बसलेला असतो. appeared first on पुढारी.