धाराशिव : दोन हजारांची लाच घेताना, दोन पोलिसांसह एकाला अटक

धाराशिव, Bharat Live News Media वृत्तसेवा : वाशी येथे अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचार्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली. वाशी येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, की यातील तक्रारदाराविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पुढील कडक कारवाई न करता केवळ किरकोळ कारवाईवर भागविण्यासाठी पोलीस शिपाई तानाजी त्रिंबक तांबे (वय 28) आणि पोलीस शिपाई रणजित कासारे (वय 31) यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून खासगी व्यक्ती पवन हिंगमिरे याच्यामार्फत लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. दोन पोलीस कर्मचार्यांसह तिघांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Latest Marathi News धाराशिव : दोन हजारांची लाच घेताना, दोन पोलिसांसह एकाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.
