शिक्षण : आनंददायी शिक्षणासाठी…
संदीप वाकचौरे
आज पदवीधारक उमेदवाराला मुलाखतीस गेल्यावर संभाषण, संवाद करता येत नाही. आपल्या मनातील विचार व्यक्त करता येत नाहीत. खरे तर कोणताही विषय शिकताना संभाषण कौशल्य अधिक महत्त्वाचे असते. शिकण्यासाठी श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही कौशल्यं मदतीची ठरतात. ही कौशल्यं उत्तम असतील तर भाषेबरोबर इतर विषय शिकण्यासदेखील मदत होते.
भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करून सुमारे तीन वर्षे होत आहेत. त्या धोरणाने सूचित केलेले बदलांची अंमलबजावणी केंद्र सरकार बरोबर विविध राज्य सरकारांनी देखील आपापल्या राज्यात सुरू केली आहे. धोरणातील काही महत्त्वाच्या बदलांचा विचार करून कार्यवाही आपल्या राज्यातही सुरू झाली आहे. धोरणात शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडीची तीन वर्षे आणि पहिली व दुसरीची दोन वर्षे असा पाच वर्षांचा एकच स्तर निश्चित करत त्याला पायाभूत स्तर म्हटले आहे. हा नवा बदल असला तरी तो धोरणातील महत्त्वाचा बदल आहे. शालेय शिक्षणातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बालवाडीचा तीन वर्षांचा कालावधी हा शिक्षणाच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या स्तरावर बालकांचे शिकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रासाठी भविष्याचा पाया घालणारे ठरणार आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्रगत देशांनी या स्तरावरील बालकांचे शिकणे अधिक महत्वाचे मानले.
आपल्याकडे त्यादृष्टीने हे पडणारे पाऊल महत्त्वाचे आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण प्रक्रियेत नेमके काय घडणार आहे याबद्दल उत्सुकता मोठ्या प्रमाणावर होती. त्यानुसार केंद्र सरकारने देशासाठी पायाभूत स्तराचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आऱाखडा विकसित करत जाहीर केला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारने देखील राज्यासाठीचा पायाभूत स्तराचा स्वतंत्र राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करत नुकताच जाहीर केला. हा आराखडा प्रसिद्ध झाल्याने पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि अध्ययन, अध्यापनाची दिशा निश्चित होण्यास मदत होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने या आराखड्याचे महत्त्व अधिक आहे.
शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने देशातील विविध शाळांमध्ये दाखल असलेल्या परंतु शिक्षणाच्या अपेक्षित क्षमता प्राप्त करू न शकणार्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे पाच कोटी इतकी असल्याचे म्हटले आहे. या मुलांचा पाया अधिक पक्का होण्याची गरज सातत्याने आजवर व्यक्त करण्यात आली आहे. मुले शिकण्यापासून दूर राहणे, शाळाबाह्य होणे यात जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी बोजड अभ्यासक्रम, निरस अध्यापन प्रक्रिया ही देखील कारणे आहेत. त्यादृष्टीने आराखडा काय सूचित करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2026-27 पर्यंत या देशातील इयत्ता तिसरीपर्यंत प्रत्येक बालकाला भाषा आणि गणिताच्या किमान पायाभूत क्षमता प्राप्त करता येतील यासाठी देशात निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
पायाभूत स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणून जी प्रक्रिया आराखड्यात सूचित केली आहे ती अधिक महत्त्वाची आहे. या स्तरावर क्रीडन पद्धतीने पुढे जाणे घडावे, अशी अपेक्षा असते. शिकणे होईल, पण ताण येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. येथील शिकण्याच्या प्रक्रियेतून बालकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा. शिकण्याची अभिरूची विकसित होणे गरजेचे असते. यासाठी आराखडयात विचार करण्यात आला आहे. त्यानुसार मुक्त, सरचित, जोडी, गट संभाषण, गोष्टी सांगणे, खेळणी आधारित अध्ययन, गाणी-बडबडगीते, संगीत आणि तालबद्ध हालचाली, कला व हस्तकला, वर्गातील खेळ, मैदानी आणि वर्गबाहेरील खेळ, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, क्षेत्रभेटी या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. आपले शिक्षण हाताची घडी तोंडावर बोट याच मार्गाने जात आले आहे. बहुतांश वेळी वर्गात शिक्षक एकटाच बोलत असतो आणि विद्यार्थी फक्त ऐकत असतात. विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक करायचे असेल तर शिक्षण पंचज्ञान इंद्रियाच्या मदतीने होण्याची गरज सातत्याने अभ्यासक व्यक्त करत आले आहेत. जेव्हा शिक्षणाच्या प्रक्रियेत पाचही ज्ञानइंद्रियांचा उपयोग होईल तेव्हा शिकण्यात समृद्धतेचा प्रवास सुरू होणार आहे. आजवरच्या शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अवयव म्हणून केवळ कानाचा विचार केला आहे.
उर्वरित अवयवांचे काय करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांनाच अनेकदा पडतो. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षक एकटाच बोलत असतो आणि विद्यार्थी फक्त ऐकत असतो. अशावेळी होणारे शिक्षण समग्रतेने न होता केवळ घोकंपटटीच्या आधारे होते आहे असे मानले जाते. आता पायाभूत स्तरावर पंचज्ञान इंद्रियाचा उपयोग शिकण्यात होईल यादृष्टीने प्रक्रिया आणि उपक्रम सूचविण्यात आले आहे. खरंतर कोणताही विषय शिकताना संभाषण कौशल्य अधिक महत्त्वाचे असते. शिकण्यासाठी श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही कौशल्य मदतीची ठरतात. ही कौशल्यं उत्तम असतील तर भाषेबरोबर इतर विषय शिकण्यास देखील मदत होते.
आज पदवीधारक असलेल्या उमेदवाराला मुलाखतीस गेल्यावर देखील संभाषण, संवाद करता येत नाही. आपल्या मनातील विचार व्यक्त करता येत नाहीत. मुळात प्रकटीकरण हे कौशल्याची गरज असताना शिक्षणातून तशी पेरणी होताना दिसत नाही. आराखड्यात विद्यार्थ्यांना मुक्त संवादाची वाट सूचित केली आहे. आपल्या अवतीभोवती अनेक लहान-मोठ्या घटना घडत असतात. त्या घटनाचा विचार विद्यार्थ्यांना वयानुरूप करता यायला हवा. केलेला विचार मांडता यायला हवा. त्यामुळे मुक्त संभाषणाची संधी ही महत्त्वाची ठरणार आहे. ठरून दिलेल्या विषयावर बोलता यायला हवे.
मुळात एखाद्या ठरून दिलेल्या विषयावर बोलायचे असेल तर त्यासाठी विचार करता येणे गरजेचे आहेे. त्यादृष्टीने विविध मार्ग सुचवले आहेत. प्रत्यक्ष वस्तू दाखवून निरिक्षण करून संधी दिली जाते. आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असतात. पण त्या वस्तू शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून विचार केला जात नाही. शिकण्यासाठी वर्गात आणि वर्गाच्या बाहेर असलेल्या अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. शाळेच्या परिसरात असलेल्या वेली, झाडे, त्यांची पाने, पक्षी, जनावरे, वाहने यांसारख्या कितीतरी गोष्टी असतात. त्यातून विद्यार्थ्यांना संभाषणाचा विचार करत पुढे घेऊन जाणे झाले तर शिकणे अधिक परिणाममकारक होण्यास मदत होईल. विचाराची प्रक्रिया झाली तरच निश्चित केलेल्या विषयावर बोलता येईल. त्यादृष्टीने विचार करण्यासाठीचा मार्ग शिक्षणातून निर्माण करण्याचा विचार करण्याची गरज असते. तोच व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे.
The post शिक्षण : आनंददायी शिक्षणासाठी… appeared first on पुढारी.
आज पदवीधारक उमेदवाराला मुलाखतीस गेल्यावर संभाषण, संवाद करता येत नाही. आपल्या मनातील विचार व्यक्त करता येत नाहीत. खरे तर कोणताही विषय शिकताना संभाषण कौशल्य अधिक महत्त्वाचे असते. शिकण्यासाठी श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही कौशल्यं मदतीची ठरतात. ही कौशल्यं उत्तम असतील तर भाषेबरोबर इतर विषय शिकण्यासदेखील मदत होते. भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करून …
The post शिक्षण : आनंददायी शिक्षणासाठी… appeared first on पुढारी.