अखेर मृत्यूशी झुंज अपयशी! धांदरफळ खुर्दच्या तरुणाचा दहाव्या दिवशी मृत्यू

संगमनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत डीजेच्या चाकाखाली चिरडून अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला होता. त्याच्यावरती मुंबईत एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. अखेर दहाव्या दिवशी उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे धांदरफळ घटनेतील मृतांची संख्या तीनवर जाऊन पोहोचली आहे धांदरफळ खुर्द येथील किसान खताळ यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने मिरवणूक सुरू होती. त्याचवेळी डिजेचे वाहन मिरवणुकीत घुसल्याने सहा ते सात जण चिरडले गेले. त्यात बाळासाहेब खताळ आणि भास्कर खताळ या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
तर अभिजीत ठोंबरे हा गंभीरित्या जखमी झाला होता. त्याच्यावर संगमनेर येथील मेडिकेव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्याला तत्काळ नाशिकला हलविण्यात आले. परंतु त्याची प्रकृती सुधारत नव्हती. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबई येथील केईएम या नामांकित रुग्णालयात आठ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी अपघातात धांदर फळ खुर्दमधील तिसरा बळी गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृत गणेश ठोंबरे याच्यावर धांदरफळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी मुंबईहून रात्री उशीराने त्याचा मृतदेह संगमनेरात आणला असल्याचे समजले.
हेही वाचा
खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप
खोडद येथे उपडाकघर सुरू..
संगमनेर, कोपरगावात चिनी मांजा विकताना पाच जणांविरूद्ध गुन्हा
Latest Marathi News अखेर मृत्यूशी झुंज अपयशी! धांदरफळ खुर्दच्या तरुणाचा दहाव्या दिवशी मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
