राजकारण : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष

सत्तेचा सुकाणू हाती आल्यानंतर त्याचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ कर्नाटकातील सरकार अस्थिर बनवणारी ठरू शकते. मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच चिरंजीव प्रियांक खर्गे हेच या वादात भर घालत आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये सातत्याने वाताहतीचा सामना कराव्या लागणार्‍या काँग्रेस पक्षाला सुखाचे … The post राजकारण : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष appeared first on पुढारी.

राजकारण : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष

विश्वास सरदेशमुख

सत्तेचा सुकाणू हाती आल्यानंतर त्याचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ कर्नाटकातील सरकार अस्थिर बनवणारी ठरू शकते. मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच चिरंजीव प्रियांक खर्गे हेच या वादात भर घालत आहेत.
गेल्या नऊ वर्षांमध्ये सातत्याने वाताहतीचा सामना कराव्या लागणार्‍या काँग्रेस पक्षाला सुखाचे जे चार क्षण पदरात आले, त्यामध्ये यंदाच्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करण्याची गर्जना करणार्‍या भारतीय जनता पक्षाविरोधात जी ‘इंडिया’ नामक विरोधी पक्षांची आघाडी उभी राहिली आहे, तिला बळ देण्यामध्येही कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा वाटा मोठा आहे. अनेक लोकानुनय करणारी आश्वासने देऊन का होईना, पण काँग्रेसने कर्नाटकातील सत्ता मिळवली. परंतु बदलत्या काळातील राजकारणाचा विचार केल्यास आता निवडणुकांमध्ये विजयी होऊन सत्ता मिळवण्यापेक्षाही मिळालेली सत्ता टिकवणे कठीण होत चालले आहे. कारण सत्तेचा सुकाणू हाती आल्यानंतर त्याचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ सत्तेला अस्थिर बनवणारी ठरू शकते. सध्या कर्नाटकात अशीच शक्यता निर्माण झाली आहे.
कर्नाटकात काँग्रेससमोर अडचणी वाढतच आहेत. कारण मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्यांची येत असलेली वक्तव्ये पाहता सर्व काही आलबेल आहे, असे दिसत नाही. या राज्यात काँग्रेसची सत्ता येऊन सहा महिनेही झाले नाही की मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच चिरंजीव प्रियांक खर्गे हे वादात भर घालत आहेत. अलीकडेच त्यांनी राज्यात मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळण्यासाठी आपण तयार आहोत, असे विधान करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना धक्का दिला आहे.
काँग्रेस नेत्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या सजग झाले आहेत. त्यांनीही आपणच पाच वर्षे कायम राहू, असे छातीठोकपणे सांगितले आहे. कर्नाटकातील अनेक मंत्रीदेखील सिद्धरामय्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद हे सिद्धरामय्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेकदा त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली आहेत. कर्नाटकचे आयटी मंत्री असणार्‍या प्रियांक खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रिपदावरून केलेली वक्तव्ये खळबळजनक आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, पक्षश्रेष्ठींकडून आपल्यावर जबाबदारी दिली जात असेल तर राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्यास आपण तयार आहोत. प्रियांक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे. या नेत्यांच्या मते, अशा प्रकारच्या मतांमुळे काँग्रेस अणि सरकारची प्रतिमा धुळीस मिळत आहे. अशा वक्तव्यांवरून सिद्धरामय्यांच्या भवितव्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहात आहे. या नेत्यांच्या मते, पक्षाच्या नेतृत्वाने अशा प्रकारच्या वक्तव्यांवर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केलेले वक्तव्य अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शक्यतेबाबत विचारले असता केले. पत्रकारांच्या या प्रश्नावर ते नाराज झाले. पण त्यांनी केलेल्या दाव्यामुळे अडीच-अडीच वर्षाच्या कार्यकाळावरून देखील जोरात चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या एका गटाच्या मते, अडीच वर्षांनंतर राज्यात ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदी बसविणे गरजेचे आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. त्यावेळी त्यांची मनधरणी करण्यात यश आल्याचे दिसले असले तरी काँग्रेस पक्षनेतृत्वाने त्यासाठी कोणती क्लृप्ती वापरली हे समोर आले नाही. पण आताची सर्व परिस्थिती पाहता त्यांना अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत शीतयुद्धाला पक्षातील काही नेते भाजपला जबाबदार धरत आहेत. खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपाचे आकलन केल्यास भाजपकडून राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी केली जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही हे काँग्रेस सरकारविरुद्ध मोठे कारस्थान असून ते कधीही यशस्वी होणार नाही, असे म्हटले आहे. यापूर्वी भाजपने जुलै 2019 रोजी काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार पाडून राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यावेळी भाजपने काँग्रेसचे अनेक आमदार फोडले होते. तशाच प्रकारची तयारी भाजप सध्या करत असल्याचा काँग्रेसला संशय आहे. काँग्रेसचे आमदार रविकुमार गनिगा यांनीदेखील भाजपकडून काँग्रेसच्या चार आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला होता. तसेच प्रत्येक आमदाराला 50 कोटींची रोख रक्कम आणि मंत्रिपद देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचेही म्हटले होते.
या सर्व गदारोळामुळे उठलेला धुरळा खाली बसतो न बसतो तोच कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ‘नशिबाने साथ द्यायला हवी. आपण राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहोत’, असे वक्तव्य करून वातावरणातील तणाव अधिक वाढवला आहे. कर्नाटकचे सहकार मंत्री एन. राजन्ना यांनी एका ठिकाणी बोलताना जी. परमेश्वर हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे मत मांडले होते. तुमकूर जिल्हा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहकार मंत्री राजन्ना म्हणाले, “जी. परमेश्वर आज गृहमंत्री आहेत. भविष्यात काहीही होऊ शकते. माझ्या मते आगामी काळात मुख्यमंत्री होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी राहू शकते. आम्ही ते पूर्ण करण्यासाठी काम करू. जिल्ह्यातील नेता मुख्यमंत्री होत असेल तर जिल्ह्यातील जनता आनंदी होईल. ते सीएम होत असतील तर आपल्या सर्वांनाच मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटेल.”
कर्नाटक विधानसभेत 225 आमदार आहेत. एक नामनिर्देशित अँग्लो इंडियन सदस्य आहे. म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी 113 आमदारांचे पाठबळ हवे. काँग्रेसकडे 135 आमदार तर भाजपकडे 66, जेडीएसकडे 19, अपक्ष 2 आणि अन्य दोन आहेत. भाजप आणि जेडीएस यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा विचार केला जरी त्यांना 113 चा जादुई आकडा गाठण्यासाठी 28 आणखी आमदार हवेत. म्हणजेच कर्नाटक विधानसभेत कमळ फुलवायचे असेल तर भाजपला काँग्रेसमधील 28 आमदार फोडावे लागतील. पण काँग्रेसची आमदार संख्या 135 असल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार 28 आमदारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. तसेच त्या 28 आमदारांना पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. बी. एस. येडियुराप्पा यांनी असा प्रयोग केलेला होता.
The post राजकारण : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष appeared first on पुढारी.

सत्तेचा सुकाणू हाती आल्यानंतर त्याचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ कर्नाटकातील सरकार अस्थिर बनवणारी ठरू शकते. मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच चिरंजीव प्रियांक खर्गे हेच या वादात भर घालत आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये सातत्याने वाताहतीचा सामना कराव्या लागणार्‍या काँग्रेस पक्षाला सुखाचे …

The post राजकारण : कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष appeared first on पुढारी.

Go to Source