IND vs AUS Final : आतुरता… तिसर्या विश्वविजयाची!
अहमदाबाद, वृत्तसंस्था : शेवटचे काही तास.. काही मिनिटे… भारतीय फॅन्ससाठी आता एक एक क्षण आतुरता वाढवणारा… भारतीय संघाने वर्ल्डकप (IND vs AUS Final) जिंकावा अशी प्रार्थना करतानाच… आपण जिंकू ना? अशा भीतीने न कळत पोटात कालवाकालव होणारा… जिंकलो तर सेलिब्रेशन कसे करायचे याचे आडाखे बांधणारा क्षण.. विश्वविजयाच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारा.. पण तितकाच पोटात वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ उडवणारा क्षण… क्रिकेट विश्वाचा महाराजा कोण? या प्रश्नाचे उत्तर देणारा क्षण जवळ येऊन ठेपला आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय क्रिकेट संघ पाच वेळेचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार्या या सामन्यात भारतीय संघ एक लाख प्रेक्षकांच्या साक्षीने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून दीड अब्ज जनतेचे तिसर्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करण्यास सज्ज झाला आहे. 1983 मध्ये कपिलदेव, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी भारताला आयसीसी वन डे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले होते, तेच काम आज मुंबईचा छोरा अर्थात रोहित शर्मा करेल, असा विश्वास अवघ्या भारतवर्षाला आहे. (IND vs AUS Final)
गेल्या दीड महिन्यापासून जगभरातील क्रिकेट खेळणारे देश भारतात वेगवेगळ्या मैदानांवर एकमेकांसमोर उभे ठाकले. काही सामने जिंकले, काही हरले. अखेर या सर्व देशांमधून भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले असून आज (रविवारी 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांच्यात विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी सामना होणार आहे.
एकीकडे भारतीय संघाच्या जमेच्या बाजूंची चर्चा होत असताना दुसरीकडे पाच वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला कमी लेखण्याची चूक भारताचे धुरंधर अजिबात करणार नाहीत. विश्वचषकात 8 सामन्यांत विजय मिळत अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियानेही भारताचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली आहे, पण रोहित सेना या सर्वांना पुरून उरेल यात शंका नाही. दोन्ही संघांनी शनिवारी दिवसभर टप्प्याने सराव केला. भारताकडूनच्या ऐच्छिक सरावाच्या सत्रात रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीचा भरपूर सराव केला, त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळेल, अशी शक्यता आहे.
रोड टू फिनाले (IND vs AUS Final)
1) ऑस्ट्रेलियावर 6 विकेटस्नी मात :
के.एल. राहुल (97), विराट कोहली (85) यांच्या भागीदारीमुळे भारत विजयी. के.एल. राहुल – सामनावीर
2) अफगाणिस्तानवर 8 विकेटस्नी विजय :
रोहित शर्माच्या (131) शतकामुळे भारत 90 चेेंडू शिल्लक ठेवून जिंकला. कर्णधार रोहित शर्मा – सामनावीर
3) पाकिस्तानला 7 विकेटस्नी हरवले :
भारताची भेदक गोलंदाजी, पाकला 191 धावांत रोखले. बुमराह – सामनावीर
4) बांगला देशवर 7 विकेटस्नी मात :
विराट कोहलीच्या (103) नाबाद शतकाच्या जोरावर भारत 51 चेंडू राखून विजयी. विराट कोहली – सामनावीर.
5) न्यूझीलंडवर 4 विकेटस्नी विजय :
मोहम्मद शमीच्या 5 विकेटस्मुळे न्यूझीलंडला नमवले, विराटच्या सर्वाधिक 95 धावा. मोहम्मद शमी – सामनावीर.
6) इंग्लंडविरुद्ध भारत 100 धावांनी विजयी :
शमीच्या 4 विकेटस, 87 धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर.
7) श्रीलंकेवर 302 धावांनी विजय :
श्रीलंकेचा अवघ्या 55 धावांत खुर्दा, सामनावीर शमीच्या 5 विकेटस्.
8) दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी हरवले :
विराट कोहलीचे शतक, द. आफ्रिकेला 83 धावांत गुंडाळले. सामनावीर रवींद्र जडेजाच्या 5 विकेटस्.
9) नेदरलँडवर 160 धावांनी मात :
श्रेयस अय्यर (128), के. एल. राहुल (102) यांची शतके, भारताच्या 410 धावा. श्रेयस अय्यर-सामनावीर
10) सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय :
विराटचे 50 वे शतक, श्रेयसच्या 70 चेंडूंत 105 धावा. सामनावीर मोहम्मद शमीच्या 7 विकेटस्.
रोड टू फिनाले (IND vs AUS Final)
1) भारताकडून 6 विकेटस्नी पराभव :
ऑस्ट्रेलिया 199 धावांत ऑलआऊट. वॉर्नर (41), स्मिथ (46) यांची एकतर्फी झुंज. जोश हेजलवूडच्या 3 विकेटस्.
2) दक्षिण आफ्रिकेकडून 134 धावांनी पराभूत :
द. आफ्रिकेच्या 317 धावांच्या उत्तरात ऑस्ट्रेलियाच्या 177 धावा.
3) श्रीलंकेला 5 विकेटस्नी हरवले :
मार्श, इंग्लिसची अर्धशतके, सामनावीर अॅडम झम्पाचे 4 बळी.
4) पाकिस्तानवर 62 धावांनी विजय :
डेव्हिड वॉर्नर (163), मिचेल मार्श (121) यांची शतके आणि 259 धावांची सलामी. वॉर्नर – सामनावीर
5) नेदरलँडला 309 धावांनी चिरडले :
वॉर्नर (104), ग्लेन मॅक्सवेल (106) यांची शतके. झम्पाच्या 4 विकेटस्.
6) न्यूझीलंडवर 5 धावांनी मात :
वर्ल्डकपमधील हा अटीतटीचा झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. शतकवीर ट्रॅव्हिस हेड – सामनावीर.
7) इंग्लंडला 33 धावांनी हरवले :
गोलंदाजांच्या सामूहिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया विजयी. 21 धावांत 3 विकेटस् घेणारा अॅडम झम्पा सामनावीर.
8) अफगाणिस्तानवर 3 विकेटस्नी विजय :
द ग्लेन मॅक्सवेल शो.. मॅक्सवेलच्या द्विशतकी खेळीने ऑस्ट्रेलिया विजयी. सामनावीर – मॅक्सवेल
9) बांगला देशवर 8 विकेटस्नी आरामात विजय :
मिचेल मार्शच्या नाबाद 177 धावांच्या जोरावर 306 धावांचे आव्हान 45 व्या षटकात गाठले. मार्श- सामनावीर.
10) सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेटस्नी मात :
लो स्कोअरच्या या सामन्यात 213 धावा करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ट्रॅव्हिस हेड – सामनावीर
भारत-पाकिस्तान सामन्याचीच खेळपट्टी!
नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 11 पिच आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्या अंतिम सामन्यात गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवण्यात आलेलीच खेळपट्टी असणार आहे. यावर चेंडूला कमी उसळी मिळेल. त्यामुळे ही खेळपट्टी फिरकीला साथ देईल, अशी शक्यता आहे. पिचवर चेंडू चांगला वळेल. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सामना जसजसा पुढे जाईल तसे फलंदाजी करणे अवघड होईल.
अंतिम सामन्यात पाऊस पडला तर..?
हवामानाची अनिश्चितता पाहता आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर मॅचमध्ये पाऊस झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
डकवर्थ लुईस नियमानुसार जर निकाल नाही लागला तर राखीव दिवशी मॅच पूर्ण केली जाईल. जेथे मॅच थांबली होती तेथून पुन्हा सुरू केली जाईल. जर राखीव दिवशी मॅच झाली नाही तर गुणतक्त्यात अव्वल संघाला विजेता घोषित केले जाईल.
हवामानाचा अंदाज
रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी अहमदाबादचे हवामान स्वच्छ असणार आहे. पावसाची शक्यता अजिबात असणार नाही. 25 ते 27 डिग्री सेल्सियस तापमान असेल. हवेचा वेग 8 कि.मी. इतका असेल. संध्याकाळी दव पडेल आणि त्याचा परिणाम देखील दिसेल. ज्यामुळे दुसर्या डावात फलंदाजी करणार्या संघाला फायदा मिळू शकेल.
नाणेफेक जिंकणारा फक्त 4 वेळा विजेता
विश्वचषकाच्या गेल्या 12 स्पर्धेत अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ फक्त चार वेळा विजयी ठरला आहे, तर नाणेफेक हरणारा संघ आठवेळा विश्वविजेता झाला आहे.
भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये विश्वविजेतेपद मिळवले, पण या दोन्ही वेळेला त्यांनी टॉस हरला होता. 2003 च्या फायनलमध्ये भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने टॉस जिंकला; परंतु सामना मात्र हरला.
भारत :
बलस्थाने : दणकेबाज सलामीची जोडी, दमदार मधली फळी याच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत 2920 धावा केल्या आहेत. यासाठी 48 विकेटस् गमावल्या. गोलंदाजीत बुमराह, सिराज आणि मो. शमी हे वेगवान गोलंदाजी त्रिकूट विरोधी संघासाठी कर्दनकाळ ठरत आहेत. भारताने स्पर्धेतील दहा विजय मिळवताना एकूण 96 विकेटस् काढल्या आहेत. यापैकी 8 संघांना ऑलआऊट केले आहे.
उणीव : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जखमी झाल्यामुळे संघाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासत आहे. याशिवाय मोहम्मद सिराज गेल्या काही सामन्यांत भरपूर धावा देत आहे. यावर संघ व्यवस्थापनाला तोडगा काढावा लागेल.
ऑस्ट्रेलिया :
बलस्थाने : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, लॅबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाला हातभार लावले आहेत. विशेषत: वॉर्नर-हेड जोडी जमली तर प्रतिस्पर्धी संघासाठी खतरनाक ठरू शकते. मार्नस लॅबुशेन हा संघाला टेकू देण्याचे काम इमानेइतबारे करीत आहे. अष्टपैलू मॅक्सवेलमुळे संघाला चांगले संतुलन मिळत आहे. वेगवान गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियाची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे.
उणीव : ऑस्ट्रेलियन फलंदाजीत अन् गोलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. तसेच भारतासारख्या फिरकी गोलंदाजीला मदत करणार्या खेळपट्ट्यांवर ते एकच लेगस्पीनर घेऊन उतरले आहेत. त्यासाठी ते पार्ट टाईम गोलंदाज मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेडवर अवलंबून आहेत.
The post IND vs AUS Final : आतुरता… तिसर्या विश्वविजयाची! appeared first on पुढारी.
अहमदाबाद, वृत्तसंस्था : शेवटचे काही तास.. काही मिनिटे… भारतीय फॅन्ससाठी आता एक एक क्षण आतुरता वाढवणारा… भारतीय संघाने वर्ल्डकप (IND vs AUS Final) जिंकावा अशी प्रार्थना करतानाच… आपण जिंकू ना? अशा भीतीने न कळत पोटात कालवाकालव होणारा… जिंकलो तर सेलिब्रेशन कसे करायचे याचे आडाखे बांधणारा क्षण.. विश्वविजयाच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारा.. पण तितकाच पोटात वेगवेगळ्या भावनांचा …
The post IND vs AUS Final : आतुरता… तिसर्या विश्वविजयाची! appeared first on पुढारी.