सातारा : सर्वांत उंच ‘सोन्या’ बैल कृष्णा कृषी महोत्सवाचे आकर्षण
कराड; Bharat Live News Media वृत्तसेवा : कराड येथे 17 जानेवारीपासून सुरू होणार्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा असा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सोन्या बैलासह या महोत्सवात दोन टनांचा रेडा, देशातील सर्वांत लहान अडीच फुटांची ‘पुंगनूर’ गाय लक्षवेधी ठरणार आहेत.
शेतकर्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती व शेतीसाठी असणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दि. 17 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या संकल्पनेतून कराडमध्ये प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जातीवंत जनावरांसह अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टींचे व शेतीविषयक उपकरणांचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा असा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या बैलाची किंमत तब्बल 41 लाखांहून अधिक असून, त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. हा बैल शांत स्वभावाचा असून, त्याची देखभाल करण्यासाठी फारसा त्रास होत नाही. पण त्याचा खुराक मात्र एखाद्या पैलवानापेक्षाही जास्त आहे.
सोन्या बैल एका माणसालाही हाताळता येतो. या बैलापासून ब्रीड तयार केले जात असून, ते देखील असेच उंच आणि देखणे तयार होते. महोत्सवात देशातील सर्वांत उंच बैलासोबतच भारतातील सर्वांत लहान पुंगनूर जातीची अडीच फूट उंचीची गायही बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 2 टन वजनाचा रेडा, 1 फूट लांबीची मिरची, दीड फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल हीदेखील खास आकर्षणे ठरणार आहेत. या प्रदर्शनात जगभरातील 11 देशातील तज्ज्ञ कंपन्यांचे मान्यवर सहभागी होणार आहेत. याठिकाणी 36 देशातील पिकांचे नमुनेदेखील पाहण्यास मिळणार असल्याने, कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
सोन्याची उंची 6.5, लांबी 8.5 फूट
सोन्या बैल देशातील सर्वांत उंच बैल असून, त्याची उंची 6.5 फूट असून लांबी 8.5 फूट आहे. दिवसातून दोन लिटर दूध, सात ते आठ अंडी, करडई तेल 200 मिली, सहा प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते. या बैलाला दोनदा वैरण दिली जाते. या बैलाचे वासरू सव्वा लाख रुपये किंमतीचे आहे.
Latest Marathi News सातारा : सर्वांत उंच ‘सोन्या’ बैल कृष्णा कृषी महोत्सवाचे आकर्षण Brought to You By : Bharat Live News Media.