चाळीसगाव शहरात १६ ते २० जानेवारी दरम्यान प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचे आयोजन
जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 40 एकरावरील या कथा सोहळ्याची पूर्वतयारी तसेच नियोजन व्यवस्था याबद्दलची सविस्तर माहिती कथा कार्यक्रमाचे आयोजक खासदार उन्मेषदादा पाटील यांनी रविवारी (ता.14) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख करण पवार, भाजपचे जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर या संकल्पनेच्या माध्यमातून आयोजित प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथा कार्यक्रमाची मूळ कल्पना राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांची असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरालगत मालेगाव रस्त्यावर सुमारे 40 एकरावर कथास्थळ साकारले असून, वाहनांच्या पार्किंगकरीता तब्बल 80 एकरात आठ वाहनतळ उभारण्यात आले आहे. प्रत्येक वाहनतळाचा विस्तार 10 एकरात असल्याने सर्व दिशांनी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची कोंडी होण्याचा प्रकार टाळता येणार आहे. कथेची वेळ दररोज दुपारी 2 ते 5 वाजेची असेल, असेही खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सांगितले.
सुमारे सात ते आठ लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज
चाळीसगाव येथील महाशिवपुराण कथा कार्यक्रमासाठी सुमारे सात ते आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची पुरेशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय कथास्थळी रात्री साधारणतः दोन ते अडीच लाख भाविक मुक्कामी थांबण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या जेवणाची सर्व व्यवस्था केली जाणार आहे. 400 मोबाईल टॉयलेट उपलब्ध राहणार असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही निकाली निघणार आहे. सुमारे 16 हजार स्वयंसेवकांनी यापूर्वीच नोंदणी केलेली असल्याने भाविकांची कोणतीच गैरसोय कथा कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार नाही.
विशेष आमंत्रितांमध्ये यांचा असेल समावेश
महाशिवपुराण कथा सोहळ्यासाठी केंद्रिय मंत्री डॉ. भागवत कराड यांचेसह डॉ. भारती पवार तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील तसेच खासदार रक्षा खडसे, जिल्ह्याचे सर्व आमदार, ग्रामपंचायतींचे सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन आदींना आमंत्रित केले आहे.
दोन लाख दिव्यांची विश्व विक्रमी श्रीराम प्रतिकृती
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्त साधून चाळीसगावात सुमारे दोन लाख दिव्यांचा वापर करून श्रीरामाची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. विश्व विक्रमी अशी प्रतिकृती 20 जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाणार आहे.
Latest Marathi News चाळीसगाव शहरात १६ ते २० जानेवारी दरम्यान प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचे आयोजन Brought to You By : Bharat Live News Media.