नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे 20ला भूमिपूजन
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी आंबेडकरी समाजाने 25 वर्ष न्यायालयीन प्रक्रिया लढत व आंदोलनाच्या माध्यमातून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मार्केटयार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन 20 जानेवारी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, जलअभियंता परिमल निकम, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, सुनील क्षेत्रे, विजय भांबळ, किरण दाभाडे, बंडू आव्हाड, अशोक खंडागळे, संजय कांबळे, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप म्हणाले, शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम होणार आहे. महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यात आला. लवकरच छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले, पुतळ्याच्या चबुतर्याची उंची 18 फूट असून पुतळा 10 फुटाचा असून एकूण 28 फुटाचा पुतळा असणार आहे.
तसेच, येत्या 6 महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे. 20 जानेवारी रोजी सायंकाळी भूमिपूजन होणार आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस अधीक्षक व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहे.
सुरेश बनसोडे म्हणाले, या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल. या माध्यमातून आजच्या युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवगत होतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा
मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप घाबरले : नाना पटोले
राज्यरंग : भाजपचे मिशन केरळ
परराष्ट्र धोरण : वेध जागतिक सत्ताकारणाचा
Latest Marathi News नगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे 20ला भूमिपूजन Brought to You By : Bharat Live News Media.