नमामि गोदा प्रस्ताव केंद्राला सादर होणार
नाशिक- केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा पहिल्या दहा शहरांमध्येही समावेश न होण्यामागे मलजलामुळे होणारे नदीप्रदूषण कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार महापालिकेचील मलनिस्सारण केंद्रे कार्यरत नसल्यामुळे थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेचे गुण घटल्याचे कारण पुढे आले आहे. त्यामुळे महापालिकेने आता मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीसाठी अमृत २ योजनेतून निधी मिळण्याची अपेक्षा सोडली असून राष्ट्रीय नदी संर्वधन योजनेअंतर्गत २७८० कोटींचा नमामि गोदा प्रकल्प सुधारीत प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्याची तयारी केली आहे.
स्वच्छ, सुंदर नाशिकची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकचा केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत पहिला क्रमांक यावा, अशी नाशिककरांची मनोकामना आहे. मात्र गेल्या सात वर्षांपासून सातत्याने महापालिकेला यश हुलकावणी देणारे ठरले आहे. यंदाही नाशिकला स्वच्छ शहरांच्या यादीत १६व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामागील कारणांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. वॉटर प्लस मानांकनामध्ये महापालिकेची दांडी उडाली. यात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रियेद्वारे वापरायोग्य करून नदीपात्रामध्ये सोडणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांतील यंत्रणा कालबाह्य ठरली आहे.
मलनिस्सारण प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा बीओडी ५च्या आत असणे बंधनकारक असताना महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांतून नदीपात्रात जाणाऱ्या प्रक्रिया युक्त सांडपाण्याचा बीओडी ३० इतका आहे. यामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पात्रातील पाणी पिण्यायोग्य उरले नसल्याचे प्रदूषण नियंत्रण अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व अद्ययावतीकरण केले जाणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे ५३० कोटींच्या निधीची गरज आहे. यासाठी महापालिकेने केंद्राच्या अमृत २ अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. परंतू या योजनेत केंद्राकडून केवळ ५० टक्के निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेला करावा लागेल. सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे महापालिकेने अमृत २ एेवजी नमामी गोदा प्रकल्पांतर्गत केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.
असा आहे नमामि गोदा प्रकल्प…
महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, अडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी मलवाहिकांचे जाळे टाकणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.
असा होणार खर्च
केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्यावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरण करणे- ३९८.१८ कोटी.
जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे- ९२७.३४ कोटी.
नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी- ६२२.०९ कोटी.
नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.
स्वच्छ शहर स्पर्धेमध्ये मलजलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढ नसल्यामुळे महापालिकेचे गुणांकन घसरले. अमृतवाणी योजनेअंतर्गत महापालिकेला निधी मिळेल मात्र त्यात ५० टक्के खर्च आपल्याला उचलावा लागेल. हे लक्षात घेत राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत नमामी गोदा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाईल. – संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता
हेही वाचा :
मॉलच्या छतावर भव्य अॅक्वॅरियमचा आभास!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
उणे 30 अंश तापमानात ओले केस घेऊन गेली बाहेर आणि…
Latest Marathi News नमामि गोदा प्रस्ताव केंद्राला सादर होणार Brought to You By : Bharat Live News Media.