पुरंदर विमानतळाला मान्यता; आम्ही आता जागेच्या प्रतीक्षेत : ज्योतिरादित्य शिंदे
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुरंदर विमानतळाला केंद्राने मान्यता दिली आहे. आता आम्ही राज्य सरकारकडून मिळणार्या जागेच्या प्रतीक्षेत आहोत. जागा मिळाल्यावर लगेच कार्यवाही करू, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना सांगितले. पुण्यातील नवीन टर्मिनलच्या पाहणीसाठी ज्योतिरादित्य शिंदे पुण्यात आले होते. पाहणी झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्यासंदर्भातील प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरकार बदलले की हा प्रश्न प्रलंबितच राहत आहे. मात्र, राज्यातील महायुती सरकारच्या काळात हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मागे एकदा पुणे विमानतळावरील एरोमॉल पार्किंगच्या उद्घाटनावेळी पत्रकारांनी राज्यमंत्री शिंदे यांना पुरंदर विमानतळाबाबत प्रश्न विचारले होते. त्या वेळी त्यांनी याबाबत न बोलता काढता पाय घेतला होता. शुक्रवारी (दि. 12) पुन्हा पुण्यात पत्रकारांनी हाच प्रश्न शिंदे यांना विचारला. त्या वेळी त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देत पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत दिले.
मागील महिन्यात जे. डब्ल्यू. मेरिएटमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ झाल्यास पुणे शहर हे देशातील ग्रोथ इंजिन बनेल, असे उद्गार काढले होते. त्यानंतर आता केंद्रीय हवाईमंत्र्यांनीच शुक्रवारी लोहगावमधील विमानतळ टर्मिनलमध्ये केंद्राने या विमानतळाला मान्यता दिल्याचे सांगत आता फक्त राज्य सरकारने जागा देण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.
नवीन टर्मिनल स्वच्छ पाहिजे मला, साफ करा… विमानतळ अधिकार्यांची झाडाझडती
केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी नवीन टर्मिनलची बारकाईने पाहणी केली. त्या वेळी त्यांना येथे बरीच अस्वच्छता असल्याचे आढळले. तेव्हा शिंदे यांनी विमानतळ अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली आणि नवीन टर्मिनल स्वच्छ पाहिजे मला… साफ करा…! असा सज्जड दमच दिला.
लोहगावमधील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या पाहणीसाठी शिंदे आले होते. त्यांनी नवीन टर्मिनल इमारतीच्या आतमधील आणि बाहेरील सर्व ठिकाणाची बारकाईने पहाणी केली. त्या वेळी त्यांना गंजलेले चेंबर, त्याचे निघालेले खिळे, ठिकठिकाणी बसलेली धूळ, प्रवेशद्वारावरची निघालेली अक्षरे पाहायला मिळाली. त्या वेळी त्यांचा संताप अनावर झाला. आणि त्यांनी विमानतळ अधिकार्यांना चांगलाच दम भरत, तातडीने स्वच्छतेचे आदेश दिले.
नवीन टर्मिनलचे उद्घाटन तीन आठवड्यांत होणार
लोहगावमध्ये उभारलेले नवीन विमानतळ टर्मिनलचे काम आता जवळपास झाले आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांतच त्याचे उद्घाटन केले जाईल, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. पुण्यातील लोहगावमध्ये उभारलेल्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, नवीन टर्मिनल 5 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्याची वार्षिक प्रवासी वाहण्याची क्षमता वाढणार आहे. 2014 मध्ये पुण्यातून 17 शहरांकरिता विमानांचे अवागमन होत होते. आता ती संख्या 36 च्या घरात आली आहे. त्याबरोबर 2 आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेदेखील होत आहेत.
हेही वाचा :
ससून ड्रग प्रकरण : डॉ. संजीव ठाकूर यांचे पाय खोलात
साताऱ्यात मध्यरात्री गोळीबार; कमानी हौद परिसरात भीतीचे वातावरण
Latest Marathi News पुरंदर विमानतळाला मान्यता; आम्ही आता जागेच्या प्रतीक्षेत : ज्योतिरादित्य शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.