कोल्हापूर : जिल्हा बार असो.च्या सभेत जोरदार वादावादी
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य वकील परिषदेतील खर्चाच्या कारणावरून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण विशेष सभेत सत्ताधारी पदाधिकारी व वकिलांत शुक्रवारी जोरात वादावादी झाली. हमरीतुमरीनंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई, महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांच्यासह पदाधिकार्यांनी सभेतून दप्तरासह काढता पाय घेतला. दरम्यान, संतप्त वकिलांची ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे यांच्या अध्यक्षतेखाली समांतर सभा झाली. अॅड. देसाई, अॅड. घाटगे यांच्या मनमानीचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा ठराव केला.
विशेष सर्वसाधारण सभेनंतर दोन्हीही गटांकडून परस्परविरोधी दावे-प्रतिदावे करण्यात आले. अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई यांनी, विशेष सभा नियमानुसार पार पडली असून, पोटनियम दुरुस्तीसह आयत्यावेळच्या विषयांच्या ठरावांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे, असा दावा केला. अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. गिरीश खडके, अॅड. आर. एल. चव्हाण, अॅड. रणजित गावडे, अॅड. अशोक पाटील यांनी, जिल्हा बार असोसिएशनच्या मान्यतेशिवाय अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई, अॅड. विवेक घाटगे यांच्यासह संचालकांनी राज्य वकील परिषदेवर केलेली उधळपट्टी अनाठायी व बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. त्यांच्या कृतीचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या वतीने 3 डिसेंबरला कोल्हापुरात वकिलांची राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सभासद वकिलांच्या मान्यतेशिवाय 75 हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याने ज्येष्ठ विधिज्ञांसह सभासदांमध्ये खदखद होती. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. देसाई यांनी न्याय संकुलातील छत्रपती शाहू सभागृहात बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यावर पडसाद उमटले.
पोटनियम दुरुस्तीच्या ठरावानंतर बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गिरीश खडके, अॅड. अशोक पाटील, अॅड. प्रशांत शिंदे, अॅड. आर. एल. चव्हाण, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. माणिकराव मुळीक यांनी आक्रमक पवित्रा घेत अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रशांत देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राज्य वकील परिषदेसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने केलेला खर्च कोणत्या अधिकारात करण्यात आला? असोसिएशनची मान्यता घेण्यात आली होती का? नियम, कायदे धाब्यावर बसवून संस्थेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी, बार असोसिएशनकडून झालेल्या खर्चाबाबत मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी अन्य अध्यक्षांनी परस्पर खर्च केलेला आहे. त्यामुळे आपण काहीही चुकीचे वर्तन केले नाही, असे स्पष्टीकरण देताच वादावादीसह हमरीतुमरीला सुरुवात झाली. संतप्त ज्येष्ठ विधिज्ञांसह उपस्थित वकिलांनी सत्ताधारी पदाधिकार्यांवर टीकेची झोड उठवीत राजीनाम्याची मागणी केली.
सभागृहात वादावादी सुरू असतानाच बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रशांत देसाई, उपाध्यक्ष विजयसिंह पाटील, सेक्रेटरी तेजगोंडा पाटील यांच्यासह संचालकांनी दप्तरासह सभेतून काढता पाय घेतल्याने पुन्हा जोरात वादावादी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे यांच्या अध्यक्षतेखाली समांतर सभा घेण्यात आली. घाटगे, देसाई यांच्या वर्तनाचा निषेध करीत राजीनाम्याच्या मागणीचा ठराव करण्यात आल्याचे अॅड. रणजित गावडे, सर्जेराव खोत, प्रकाश आंबेकर यांनी सांगितले.
Latest Marathi News कोल्हापूर : जिल्हा बार असो.च्या सभेत जोरदार वादावादी Brought to You By : Bharat Live News Media.