सेन्सेक्स, निफ्टीने गाठले शिखर
मुंबई, वृत्तसंस्था : नवीन वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने आयटी क्षेत्रातील जबरदस्त तेजीमुळे मागील सर्वकालीन उच्चांक मोडून काढत शुक्रवारी नवे शिखर गाठले. या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 965 अंकांनी वाढून 72,680 चा नवीन उच्चांक गाठला आणि निफ्टी 21,900 पार झाला. त्यानंतर सेन्सेक्स 847 अंकांनी वाढून 72,568 वर बंद झाला. तसेच निफ्टी 247 अंकांच्या वाढीसह 21,894 वर बंद झाला. यामुळे दिवसभरात गुंतवणूकदारांनी तब्बल 2.76 लाख कोटींची कमाई केली.
ऑटो आणि हेल्थकेअर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. आयटी निर्देशांक 5 टक्क्यांनी वाढला. रिअल्टी, ऑईल आणि गॅस निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी अर्धा टक्क्याने वधारले. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे आयटी शेअर्स तेजीत राहिले. निफ्टीने या सत्रात 21,900 चा टप्पा ओलांडला.
इन्फोसिस टॉप गेनर
सेन्सेक्स 72,148 वर खुला झाला. नंतर तो 72,720 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स टॉप गेनर्स ठरला. हा शेअर्स दुपारच्या सत्रात 7.87 टक्क्यांनी वाढून 1,612 रुपयांवर पोहोचला. टेक महिंद्राचा शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी वाढून 1,311 रुपयांवर गेला. विप्रो, टीसीएस प्रत्येकी 4 टक्क्यांनी वाढले. एचसीएल टेक 3 टक्क्यांनी वाढला. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एलटी, भारती एअरटेल, कोटक बँक हे 1 ते 2 टक्क्यांदरम्यान वाढले. बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक, पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.
बाजार भांडवल 373.24 लाख कोटींवर
विक्रमी तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध सर्व स्टॉक्सचे बाजार भांडवल 2.76 लाख कोटी रुपयांनी वाढून 373.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. डॉलरमध्ये मोजल्यास भारतीय शेअर बाजाराची सध्याची उलाढाल सुमारे 4.49 ट्रिलियन डॉलर आहे आणि हाँगकाँगला मागे टाकून भारतीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार म्हणून पुढे येत आहे.
Latest Marathi News सेन्सेक्स, निफ्टीने गाठले शिखर Brought to You By : Bharat Live News Media.