Nagar : पेन्डन्सी दिसली तर विभागप्रमुखांवरही कारवाई!

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचा कारभार आणखी गतीमान करण्यासाठी सीईओंच्या संकल्पनेतून आता विभागनिहाय तपासणी हाती घेण्यात आली आहे. यात कर्मचार्यांची उपस्थिती, टपाल, फायलींचा निपटारा याचा आढावा घेतला जात आहे. पहिल्याच दिवशी बांधकामसह पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाची तपासणी करण्यात आली असून, यात पेन्डन्सी आढळलेल्या कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या विभागात त्रुटी आढळतील, त्या विभागप्रमुखांवर कारवाई केली जाणार असल्याचेही विश्वसनिय सूत्रांकडून समजले.
जिल्हा परिषद सध्या प्रशासक म्हणून सीईओ आशिष येरेकर हे दीड वर्षांपासून कारभार हाकत आहेत. या कालावधीत प्रशासन गतीमान होत असताना, यात आणखी गती यावी, यासाठी त्यांनी विभागनिहाय तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे हे स्वतः सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या टीमसोबत तपासणी मोहिमेवर आहेत. पहिल्या दिवशी पशुसंवर्धन, आरोग्य आणि बांधकाम उत्तर विभागात पहिल्या दिवशी तपासणी करण्यात आली. यात आठवड्यात किती टपाल आलेत, किती प्रस्ताव मिळालेत, त्यावर काय कार्यवाही झाली, किती प्रलंबित आहेत, त्याची कारणे काय आहेत, इत्यादीची तपासणी झाल्याचे समजले. या तपासणीमुळे प्रशासनाला आणखी गती येणार असल्याचे संकेत आहेत.
अॅन्टीचेंबरमध्येही बिलांचे गठ्ठे!
पथकाला तपासणीत एका कर्मचार्याच्या टेबलवर मेडीकल बिलांच्या मोठ्या प्रमाणात फायली निदर्शनास आल्या. शिवाय विभागप्रमुखांच्या अॅन्टीचेंबरमध्येही बिलांचे गठ्ठे आढळल्याचे कानावर आले. एकच कर्मचारी असल्याने ही पेन्डन्सी दिसल्याचे तपासणीत पुढे आल्याचे समजले.
सीईओ स्वतः करणार तपासणी!
सीईओ येरेकर हे स्वतः काही विभागात अचानक तपासणीसाठी जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या तपासणीचा कर्मचार्यांनीही चांगलाच धसका घेतला आहे. काही विभागांत तर फायली वेगात फिरताना दिसू लागल्या आहेत.
Latest Marathi News Nagar : पेन्डन्सी दिसली तर विभागप्रमुखांवरही कारवाई! Brought to You By : Bharat Live News Media.
