नांदेड : माळेगाव यात्रेत श्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती

माळाकोळी, Bharat Live News Media वृत्तसेवा : माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबा यात्रानिमित्त झालेल्या कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती लोहा तालुक्यातील सावरगावचा श्याम निवृत्ती चांदणे यांनी जिंकली. त्यांनी नराटवाडी पेंडू तालुका पालम येथील नागेश नरवटेची पाठ टेकवली.
माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन आमदार श्याम सुंदर शिंदे -पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार लाड, गट विकास अधिकारी अडेराघो, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, जनार्दन तिडके, केशवराव तिडके, शामअण्णा पवार, हनमंत धुळगंडे, ग्रामविकास अधिकारी संभाजी धुळगंडे आदींची उपस्थिती होती.
माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील कुस्तीपट्टूंनी हजेरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.
माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाड्याकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी डी.आय. गायकवाड, धनंजय देशपांडे, गजानन शिंदे, पी.एम. वाघमारे, सतिश चोरमले यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य व भालचंद्र रणश्युर यांनी केले.
कुस्ती फडाच्या विकासासाठी निधी देवू – आमदार श्यामसुंदर शिंदे
माळेगाव यात्रेतील कुस्तीचा फड मल्लांना प्रोत्साहन देणारा आहे. अनेक कुस्तीगीरांनी याच मैदानातून पुढे नावलौकिक मिळवला आहे. कुस्ती फडाच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देवू, असे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले. पुढच्या वर्षांपासून जिल्हा परिषदेने मॅटवर कुस्त्या घ्याव्यात. बक्षिसांच्या रकमेत वाढ करावी. कुस्त्यांच्या वेळी मैदानात औषधोपचारासाठी कायम सुविधा ठेवावी. कुस्तीच्या विकासासाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करु, असेही ते म्हणाले.
हेही वाचा
नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू
Nanded News: माळेगावच्या यात्रेत ‘उधार’ गाढवांचा बाजार; २५ वर्षांची परंपरा कायम
नांदेड: यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेला सुरुवात
Latest Marathi News नांदेड : माळेगाव यात्रेत श्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती Brought to You By : Bharat Live News Media.
