मिशेल-सौदीने पाकिस्तानचा वाजवला बँड! किवींनी पहिली टी-20 जिंकली
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : PAK vs NZ T20 : ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान किवी संघाने डॅरेल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर 20 षटकांत 8 गडी गमावून 226 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 18 षटकांत 180 धावांवरच गारद झाला.
मिशेल-केन जोडीचा पाक गोलंदाजांना दणका
पाकिस्तानचा नवा टी-20 कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघी 1 धाव झाली असताना त्यांनी पहिली विकेट गमावली. डेव्हॉन कॉनवे खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर फिन अॅलन (34), मार्क चॅपमन (26), ग्लेन फिलिप्स (19) हे काही अंतरांनी बाद झाले. या पडझडीनंतर मिशेल आणि विल्यमसन यांनी शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. मिशेलने 27 चेंडूत 61 धावांची खेळी केली. हे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक तसेच पाकिस्तानविरुद्धचे दुसरे अर्धशतक ठरले. त्याने विल्यमसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसननेही या सामन्यात शानदार फलंदाजी करत 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर तो 57 धावा करून बाद झाला. त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 18 वे अर्धशतक ठरले. पाकिस्तानकडून नवोदित अब्बास आफ्रिदी आणि कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने प्रत्येकी तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज हरिस रौफला दोन विकेट्स मिळाल्या.
साऊदीकडून पाकची फलंदाजीला सुरुंग
227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघाच्या डावाची सुरुवात सईम अयुब आणि मोहम्मद रिझवान यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 33 धावा जोडल्या. अयुब 8 चेंडूत 27 धावा करून धावबाद झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साऊदीने मोहम्मद रिझवानला (25) पायचीत केले. पाकिस्तानला तिसरा धक्का नवव्या षटकात फखर (15) जमानच्या रूपाने बसला. ईश सोधीने त्याला माघारी धाडले. इफ्तिखार अहमदने 17 चेंडूत 24 धावांची खेळी केली. पाकिस्तानने 16व्या षटकात आझम खान आणि शाहीन आफ्रिदीच्या विकेट्स गमावल्या. पुढच्याच षटकात बाबर आझमही पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरने 35 चेंडूत 57 धावांची खेळी केली. उसामा मीरला एकच धाव करता आली. हॅरिस रौफला बाद करत साऊदीने पाकिस्तानचा डाव संपवला. न्यूझीलंडकडून साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अॅडम मिलने आणि बेन सिअर्सने प्रत्येकी 2 बळी मिळवले. ईश सोधीला 1 विकेट मिळाली.
Latest Marathi News मिशेल-सौदीने पाकिस्तानचा वाजवला बँड! किवींनी पहिली टी-20 जिंकली Brought to You By : Bharat Live News Media.