उपेक्षित रुग्णांना दिलासा देणार्या एआय एनएलपीवरील शोधप्रबंध सादर
अमीन खान
तळेगाव दाभाडे : दूर डोंगरी आणि दर्या खोर्यातील रुग्णांच्या रोगांचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञांना तत्काळ करता यावे, यासाठी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील एनएमआयइटी शैक्षणिक संस्थेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित संशोधन केले असून, त्याबाबतचा शोधप्रबंध (रीसर्च पेपर) टेलर अॅण्ड फ्रान्सिस या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिध्दीसाठी सादर केला आहे. हा शोधनिबंध स्वीकारला गेला असून, त्यावर संशोधक विद्यार्थी शिवम सिंग आणि मार्गदर्शक डॉ. सी. डी. कोकणे लवकरच तज्ज्ञांच्या कमिटीसमोर सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी ‘दैनिक Bharat Live News Media’शी बोलताना गुरुवारी दिली.
देशातील 72 टक्के नागरिक ग्रामीण भागातील
दैनिक Bharat Live News Mediaत बुधवारी (दि. 10) प्रसिध्द झालेल्या ‘एआय तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरण्यासंदर्भात हालचाली’या मथळ्याच्या बातमीनंतर एनएमआयइटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे आणि आयटी विभागप्रमुख डॉ. सी. डी. कोकणे यांनी सविस्तर चर्चा केली. डॉ. कोकणे म्हणाले, की आपल्या देशातील सुमारे 72 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात. भौगोलिक विविधतेमुळे त्यापैकी सुमारे 60 टक्के रुग्णांच्या रोगांचे वेळेत निदान करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्था पुरेशी नाही.
अलीकडे कृत्रिम बुध्दिमत्तेतील तंत्रज्ञानात झालेल्या प्रगत संशोधन आणि विकासामुळे त्याचा उपयोग याकामी कसा करता येईल, यावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. भाषांमधील विविधता हे भारतीय एआय तंत्रज्ञानातील मोठे आव्हान असल्याने आमच्या संशोधनाचा केंद्रबिंदू भाषा हा राहिला. त्यातून ‘रोल ऑफ नॅचरल लॅग्वेंज प्रोसेसिंग इन हेल्थकेअर डोमेन फॉर एनालायजिंग पेशन्टस् हेल्थ’ हा शोधप्रबंध लिहिला गेला. संशोधक विद्यार्थी शिवम सिंग याने त्यावर वर्षभर मेहनत घेतली.
एनएलपीच्या संशोधनावर भर
डॉ. कोकणे यांनी मशिन लर्निंग तंत्राचा वापर करून शब्दसंवेदना नि:संदिग्धकरणासाठी अनुकूल अल्गोरिदम याविषयावर पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग संस्थेतील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे प्राचार्य डॉ. देवतारे यांनी सांगितले. डॉ. कोकणे यांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानातील विकासकामात भाषेवर आधारित संशोधनाचे महत्त्व, विशेषत: भारतासारख्या बहुभाषिक (मल्टिलिंग्वल) देशात आव्हानात्मक आहे. म्हणून आम्ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) हे आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी खूप आवश्यक असल्याने त्यावर संशोधनकार्य करण्यावर भर दिला आहे. जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल, तसतसे आरोग्यसेवेतील एनएलपीचे एकत्रीकरण करून रुग्णसेवेशी संबंधित प्रशासन आणि संशोधनाच्या विविध पैलूंमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी करायच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
आरोग्यसेवेतील एनएलपीचे भविष्य आशादायक असताना, डेटा गोपनीयता, नैतिक विचार आणि सतत तांत्रिक परीक्षणासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे डॉ. देवतारे यांनी ‘Bharat Live News Media’शी बोलताना सांगितले. एआय आधारित एनएलपी ही अधिक कार्यक्षम, रुग्णकेंद्रित आणि डेटा-चलित आरोग्यसेवा व्यवस्था तयार करण्यात निःसंशयपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा आशावाद डॉ. कोकणे यांनी व्यक्त केला.
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची (एनएलपी) कार्यक्षमता
प्रगत क्लिनिकल निर्णय प्रणाली सुलभ करते
रुग्णांच्या डेटाचे मोठ्या प्रमाणावर आकलन, विश्लेषण शक्य
एनएलपी अल्गोरिदम डॉक्टरांना अधिक माहिती देते
जलद निदान, वैयक्तिक उपचाराचे नियोजन आणि रुग्णाची काळजी
एआय चलित एनएलपीची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना त्यांनी क्लिनिकल दस्तऐवजीकरण सुधारणे, आपोआप लिप्यंतरण आणि डॉक्टर व रुग्णांमधील परस्पर संवादाचे शोधण्यायोग्य डेटामध्ये रूपांतरण करून विश्लेषण करता येणे शक्य होणार आहे. यामुळे केवळ आरोग्यसेवेवरील भार कमी करणार नाही तर, वैद्यकीय नोंदींची अचूकता आणि कार्यक्षमतादेखील प्रचंड वेगाने करू शकेल. आरोग्यसेवेपासून उपेक्षित रुग्णांना मोठा दिलासा त्यामुळे मिळू शकेल.
– डॉ. सी. डी. कोकणे, आयटी विभागप्रमुख, एनएमआयइटी
हेही वाचा
बीड : अवैध वाळू उपसा करताना मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू
पवनाथडी जत्रेस उत्साहात सुरुवात; सोमवारपर्यंत जत्रेचा आनंद घेता येणार
युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल : पंतप्रधान मोदींचे आवाहन
Latest Marathi News उपेक्षित रुग्णांना दिलासा देणार्या एआय एनएलपीवरील शोधप्रबंध सादर Brought to You By : Bharat Live News Media.