पवनाथडी जत्रेस उत्साहात सुरुवात; सोमवारपर्यंत जत्रेचा आनंद घेता येणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेस गुरुवारी (दि. 11) उत्साहात सुरुवात झाली. जत्रेत शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांसह विविध वस्तू, साहित्य विक्रींचे महिला बचत गटांचे तब्बल 822 स्टॉल आहेत. पहिल्याच दिवशी बहुतांश स्टॉल सुरू झाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाले. या वेळी खा. श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर उषा ढोरे, उपायुक्त अजय चारठाणकर अधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम झाला.
दिव्यांग बचत गटांचे 5 स्टॉल
जत्रेत एकूण 450 स्टॉल उभारण्यात आले होते. त्याचे दोन भाग करून 822 महिला बचत गटांनी आपले स्टॉल मांडले आहेत. त्यात तीन विभाग करण्यात आले असून, बचत गटांनी तयार केलेले विविध वस्तू, साहित्य, सौंदर्यप्रसाधने, कपडे, चित्र, स्टेशनरी आदींचे स्टॉल आहे. तर, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या स्टॉलचा एक विभाग आहे. त्यात पापड, पुरण पोळी, झुणका भाकर, विविध चटण्या, लोणचे, मसाले, वडापाव, भजी, आईस्क्रिम, वेगवेगळे रस, चहा व थंडपदार्थ आदींचे स्टॉल आहेत. मांसाहारी विभागात चिकण, मटन, मासे आदींचे खगंम खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. काही स्टॉलवर चुलीवरचे खाद्यपदार्थ मिळत आहेत. तसेच, तृतीयपंथी बचत गटांचे 5 आणि दिव्यांग बचत गटांचे 5 स्टॉल लावण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी सर्व स्टॉल सुरू झाले आहेत. तसेच, नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
पवनाथडीचा सहकुटुंब आनंद घ्या
पवनाथडी जत्रेत विविध वस्तू व साहित्य तसेच, शाकाहारी व व मांसाहारी खाद्यपदार्थांचे असंख्य स्टॉल आहेत. बालगोपाळांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ व खेळणी जत्रेचे आकर्षक आहे. तसेच, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जत्रा सोमवारी (दि. 15) चालणार आहे. जत्रेचा सहकुटुंब भेट देऊन आनंद घ्यावा, असा आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शहरवासीयांना केले आहे.
व्यावसायिक स्टॉलला यंदा नो एन्ट्री
गेल्या वर्षी जत्रेत महिला बचत गटांच्या नावावर व्यावसायिक, हॉटेलवाले व टपरीधारकांनी स्टॉल लावले होते. त्याबद्दल महिला बचत गटांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार, यंदा केवळ महापालिकेकडे नोंदणी असलेल्या बचत गटांना स्टॉल देण्यात आले आहेत. व्यावसायिकांना यंदा जत्रेत घुसखोरी करून देण्यात आलेली नाही, असे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.
महापालिकेचे 10 स्टॉल
पवनाथडी जत्रेत महापालिकेच्या विविध विभागांचे 10 स्टॉल आहेत. महापालिकेच्या समाज विकास विभागाचे चार स्टॉल आहेत. त्यात दिव्यांग कक्ष, दीपस्तंभ, पीएम स्वनिधी, विविध कल्याणकारी योजना आदी कक्ष आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, वैद्यकीय विभागाचेही स्टॉल आहेत. त्या स्टॉलवर त्या विभागाची सविस्तर माहिती दिली जात आहे.
हेही वाचा
युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल : पंतप्रधान मोदींचे आवाहन
तमन्ना भाटिया आणि महेश बाबू एकत्र, सेटवरील फोटो पाहाच
मराठा आरक्षण सर्वेक्षणाला पालिका अभियंता जुंपले!
Latest Marathi News पवनाथडी जत्रेस उत्साहात सुरुवात; सोमवारपर्यंत जत्रेचा आनंद घेता येणार Brought to You By : Bharat Live News Media.