वैजापुरात घरातून दीड लाखाचा ऐवज लंपास

वैजापूर, Bharat Live News Media वृत्त्तसेवा : बाहेरगावी गेलेल्या एका पेन्शनधारक महिलेच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शहरातील विनायक कॉलनीत शुक्रवारी रात्री घडली. शहरात सध्या चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिस यंत्रणा मात्र त्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विनायक कॉलनीत मंगल धुपचंद बाणदार या एकट्याच राहतात. त्या 13 डिसेंबर रोजी नातलगाकडे विवाह असल्याने घराला कुलूप लावून गेल्या होत्या. विवाहानंतर त्या अन्य राज्यात फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 6 जानेवारीला त्यांना शेजारील महिलेने फोन करून घराचा कडी-कोयंडा तुटलेला असून चोरी झाल्याचे कळविले. त्यानुसार त्यांच्या मुलाने येऊन बघितल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
बुधवारी मंगलबाई वैजापूरला परतल्यावर त्यांना घरात ठेवलेले रोख 25 हजार रुपयांसह सोन्याची पोत, बांगड्या, मणी, डोरले, मंगळसूत्र चांदीचे शिक्के, जोडवे, देवीच्या मूर्ती असा एकूण 1 लाख 53 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे दिसून आले.
या प्रकरणी मंगल धुपचंद बाणदार ( रा. विनायक कॉलनी, वैजापूर ) यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहर व परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा नेमकी कोठे गस्त घालते असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
Latest Marathi News वैजापुरात घरातून दीड लाखाचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.
