चीनमध्ये उभी राहिली बर्फाची दुनिया!

बीजिंग : हिवाळ्यात अनेक देशांमध्ये ‘स्नो अँड आईस फेस्टिव्हल’ होत असतात. ‘स्नो’ म्हणजे ‘हिम’ किंवा पांढरा, भुसभुशीत बर्फ आणि ‘आईस’ म्हणजे पाण्याचा घनस्वरूपातील बर्फ. या दोन्हींचा वापर करून अनेक कलाकृती बनवल्या जातात. कॅनडापासून चीनपर्यंत अनेक देशांमध्ये त्यांचे महोत्सवही होत असतात. नदीच्या गोठलेल्या पाण्यातून बर्फाच्या लाद्या आणून त्यापासून बर्फाचे हॉटेलही उभे राहत असते. अशा हॉटेलमधील ताट-वाट्या व शोभेच्या वस्तूंपर्यंत तसेच अगदी बेडपर्यंत सर्व काही बर्फाचेच असते!
चीनमधील उत्तरेकडील हार्बिनमधील असा स्नो अँड आईस फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. तिथे बर्फाची एक न्यारी दुनियाच बनवलेली असते. बर्फाचे मोठे महाल, घसरगुंडी, पूल, कलाकृती असे बरेच काही तिथे असते. आता यावर्षीही हार्बिन महोत्सवातील छायाचित्रे समोर आली आहेत.
हेलाँगजियांग येथे हा महोत्सव भरवला जात असतो. त्यामध्ये बर्फाचे एक नवे शहरच वसवले असल्याचे दिसून येते. त्यामध्ये पारंपरिक चिनी थाटाच्या इमारती, रस्ते, पूल वगैरे आहेत. जुन्या काळातील मंदिरांच्या प्रतिकृतीही याठिकाणी पाहायला मिळतात. वाळूच्या शिल्पकृती बनवतात तशा इथे बर्फाच्या अनेक भव्य कलाकृती बनवल्या जातात. रात्रीच्या वेळी तिथे रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांची सुंदर रोषणाई असते व या सर्व कलाकृती अधिकच उजळून निघतात. अनेक कलाकार दिवस-रात्र मेहनत घेऊन या कलाकृती बनवतात. हार्बिनचे हवामान अतिशय थंड असल्याने ही बर्फाची दुनिया बरेच दिवस टिकून राहते. त्यामुळे हा महोत्सव अनेक दिवस सुरू असतो व त्या काळात जगभरातील पर्यटक ही बर्फाची नवलाई पाहण्यासाठी हार्बिनला येतात!
Latest Marathi News चीनमध्ये उभी राहिली बर्फाची दुनिया! Brought to You By : Bharat Live News Media.
