
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तर सीमेवरील स्थिती स्थिर; परंतु संवेदनशील आहे. कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे लष्कर तैनात करण्यात आले असून, ही तैनाती मजबूत आणि संतुलित आहे, अशा सूचक शब्दांत लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी भारत आणि चीन सीमावादावर गुरुवारी भाष्य केले. तसेच, राजौरी आणि पूंछमध्ये गेल्या 5-6 महिन्यांतील वाढलेल्या दहशतवादी कारवायांवर चिंता व्यक्त करताना पाकिस्तानलाही इशारा दिला.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना चीनला लागून असलेली पूर्व सीमा आणि पाकिस्तानला लागून असलेली पश्चिम सीमा या दोन्ही सीमांवरील सद्यस्थितीवर भाष्य केले. चीनशी सीमावादावर लष्करी आणि राजनैतिक पातळीवर सुरू असलेल्या वाटाघाटींकडे त्यांनी लक्ष वेधले. सोबतच, पूर्व लडाख भागात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे संरक्षण दल सज्ज असल्याचेही ते म्हणाले. भूतान-चीन सीमा चर्चेबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, भूतानसोबत आमचे मजबूत लष्करी संबंध आहेत आणि आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. दरम्यान, भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती ही चिंतेची बाब असल्याचे सांगताना लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले की, भारत-म्यानमार सीमेवरील घडामोडींवर आमचे बारकाईने लक्ष आहे. मणिपूरमधील परिस्थितीबाबत लष्करप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात शांतता प्रस्थापित झाली आहे.
लष्कराची सायबरस्पेस क्षमता वाढ
लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकतेचीही माहिती दिली. ते म्हणाले की, बदलत्या काळानुसार लष्करातील आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध पद्धती अधिक सामंजस्यपूर्ण आणि मजबूत करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, ड्रोन आणि टेहळणीसाठीची व्यवस्था यांचा समावेश आहे. सोबतच, भारतीय लष्कराची सायबरस्पेस क्षमता वाढवली जात आहे.
Latest Marathi News ‘चीन सीमेवरील स्थिती संवेदनशील’ Brought to You By : Bharat Live News Media.
