नवी मुंबई-पनवेलमधून मुंबई अर्ध्या तासात

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) महामुंबईकरांच्या वाहतुकीसाठी दाखल होत असलेल्या अटल सेतूमुळे मुंबईचा आकार, उकार आणि विस्तारही बदलणार आहे. मुंबईच्या बेटाला वाढायचे तर आकाशाच्या दिशेनेच म्हणजे टॉवर्स उभारूनच वाढावे लागेल. हा समज या सेतूने अरबी समुद्रात विसर्जीत केला असून, हीच मुंबई आता आडवी वाढण्यास सज्ज झाली आहे.
एरवी दक्षिणेकडून उत्तरेकडे मुंबईचे रस्ते एका रेषेत आजवर वाहत आले आहेत. या एकाच रेषेवर इतकी गर्दी की. सकाळ-संध्याकाळ फक्त रेटारेटी सुरू असते. ही रेटारेटी लोकलच्या डब्यांत आणि रस्त्यांवरच्या वाहनांचीदेखील मुंबई अनुभवत आली. या अफाट गर्दीमुळेच लाखो मुंबईकर फक्त प्रवासात रोज चार ते सहा तास घालवतात. हे प्रवासात चाललेले आयुष्य कदाचित अटल सेतूमुळे आता बदलेल.
शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर म्हणजेच अटल सेतूमुळे दक्षिण मध्य मुंबईत वरळी आणि शिवडी खाडीवर जोडले गेले आणि हीच दक्षिण मुंबई अरबी समुद्र पार करीत आता नवी मुंबईत चिर्ले गावाशी आपले बंधार्याचे नाते सांगू लागेल. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई प्रवासाला जिथे आज किमान 3 तास लागतात तिथे हे अंतर अटल सेतूवरून म्हणजे वरळी किंवा शिवडी ते चिर्ले फक्त अर्ध्या तासात पार करता येईल. या सेतूने नवी मुंबईच्या नावात खर्या अर्थाने मुंबई आणली आहे. याचा अर्थ नवी मुंबईचा प्रचंड मोठा परिसर नरीमन पॉईंट किंवा लोअर परळच्या अगदी निकट नेऊन ठेवला आहे. या सेतूचे एक टोक आजच्या वरळी-वांद्रे सी-लिंकच्या जवळ टेकले असल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरांनाही हा सेतू नवी मुंबईशी थेट जोडतो आहे.
* अटल सेतूवरून साध्या कारसह मालवाहतुकीच्या गाड्या आणि प्रवासी बसेसदेखील धावू शकतील.
* या सेतूचे हे पहिलेच वर्ष असल्याने एकेरी टोल अडीचशे रुपये तर जाऊन-येऊन 375 रुपये टोल आकारला जाईल.
* या सागरी सेतूवर ओपन रोड टोलिंग (ओआरटी) यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे वाहने सुसाट धावतील. टोलसाठी थांबणार नाहीत. टोलनाक्यांवरून जाणार्या गाडीचा टोल आपोआप इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वसूल केला जाईल.
* अटल सेतू बहुतांश समुद्रातून जात असल्याने दोन्ही बाजूंचे कठडे उंच असतील आणि समुद्र दिसणारच नाही ही चिंता एमएमआरडीएने आधीच दूर केली आहे. या कठड्यांमध्ये काँक्रिटचीही भिंत उभारली गेली असून, तिची उंची आणि त्यावर लोखंडी रेलिंग 90 सेंटिमीटर आहे. त्यामुळे धावत्या कारमधूनही समुद्रदर्शन सहज घडू शकेल.
Latest Marathi News नवी मुंबई-पनवेलमधून मुंबई अर्ध्या तासात Brought to You By : Bharat Live News Media.
