कर्जतला लवकरच एसटी आगार ; 50 बसची जुळवाजुळव

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागात अकरा आगार असून, नव्याने कर्जत आगाराची भर पडत आहे. कर्जत येथे बसस्थानक आणि आगाराची नवीन इमारत उभी आहे. या आगारासाठी 50 बस आणि आगारप्रमुखांसह 335 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी महामंडळाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात 14 तालुके असून, नगर (तारकपूर), संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, पाथर्डी व अकोले या अकरा तालुक्यांत एसटी महामंडळाचे आगार आहेत. उर्वरित राहाता, राहुरी व कर्जत या तीन तालुक्यांच्या ठिकाणी मात्र आगार नाहीत.
कर्जत तालुक्यात आगार सुरू व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मध्यंतरी कर्जत येथे बसस्थानकाची व आगाराची नवीन इमारत झालेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कर्जत येथे आगार सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. तालुक्याच्या मागणीला यश आले आहे. त्यामुळे लवकरच कर्जत आगाराच्या बस रस्त्यांवरून धावताना दिसणार आहेत. या आगारासाठी 50 बसची तरतूद केली जाणार असून, आगारप्रमुखांसह एकूण 335 अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी अहमदनगर विभागाच्या प्रशासनाची लगबग सुरू आहे. या आगारासाठी चालक, वाहक, यांत्रिकी, प्रशासकीय पर्यवेक्षकीय कर्मचार्यांची आवश्यकता आहे.
इच्छुकांनी बदलीसाठी विनंती अर्ज करावेत
कर्जत आगारात काम करण्यासाठी इच्छुक कर्मचार्यांनी आपापल्या आगारप्रमुखांमार्फत विनंती अर्ज लवकरात लवकर अहमदनगर येथील विभागीय कार्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे. अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर येत्या काही महिन्यांत कर्जतच्या आगाराचे कामकाज सुरू होणार आहे.
Latest Marathi News कर्जतला लवकरच एसटी आगार ; 50 बसची जुळवाजुळव Brought to You By : Bharat Live News Media.
