लोकसभा लढणारच ! राणी लंकेंचा निर्धार

श्रीगोंदा : Bharat Live News Media वृत्तसेवा : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके कुटुंबातून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे. समोर कोण उभा आहे याची फिकीर न बाळगता आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी व्यक्त केली. आ. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेचे तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. ही यात्रा श्रीगोंदा येथे आली असता राणी लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आ. नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन, शरद नवले, प्रतिभा गांधी, कारभारी बोरुडे, सुभान तांबोळी, सतीश मखरे, बंडू आढाव, दिनेश बोरुडे, वैभव शिंदे, आस्तिक ठोंबरे उपस्थित होते.
लंके म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या यात्रेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोचविण्याचा मानस आहे. या यात्रेस पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी येथून सुरुवात झाली आहे. कर्जत, जामखेड तालुक्यात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. आता ही यात्रा श्रीगोंदा तालुक्यात येऊन पोचली आहे. नगर तालुक्यात या यात्रेची सांगता होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना लंके म्हणाल्या की, लोकांचा उत्साह पाहता लंके कुटुंबातील एक उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. समोरून कोण उमदेवार असेल याची चिंता न करता सर्वसामान्यांच्या पाठबळावर या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ
माजी जि. प. सदस्या राणी लंके यांना उमेदवारी कोणाकडून करणार असे विचारले असता, वरच्या पातळीवर घडामोडी सुरू आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
Latest Marathi News लोकसभा लढणारच ! राणी लंकेंचा निर्धार Brought to You By : Bharat Live News Media.
