अवकाळी पावसामुळे जनावरांचा चारा भिजला
भोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : भोर तालुक्यात मंगळवारी (दि. 9) रात्री पहाटेपासून ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस पडला. पहाटे अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दैनावस्था झाली. जनावरांचा वाळलेला चारा भिजला. रब्बी हंगामातील पिकांना फायद्याचा ठरला आहे. तालुक्यात मंगळवारी दिवसभर ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्यांच्या जनावरांच्या चार्याचे नुकसान होऊन चारा भिजला आहे तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, घेवडा, पावटा, कांदा, भुईमूग, वाटाणा या पिकांना फायदा झाला आहे. मात्र हवेत असेच ढगाळ वातावरण राहिल्यास रब्बी पिकांवर खराब हवामानाचा फटका बसून पिकांवर किडीचा, रोगाचा प्रादुर्भाव पडण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वीट भट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
ग्रामीण भागात जळणाची साधन सामुग्री (सरपण, फाटे, शेणीच्या गोवऱ्या) अचानक आलेल्या पावसाने भिजले. पुढे उन्हाळ्यात साठवून ठेवण्याचा जनावरांचा चारा भिजल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले नाही अशा शब्दांत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील वीसगाव खोरे मांढरदेव रस्ता, भोरमार्गे कापूरव्होळ पुणे रस्ता, रामबाग रस्ता या मार्गावरील रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असुन अचानक झालेल्या पावसाने रस्ता चिखलमय निसरडा झाला आहे. बऱ्याच ठिकाणी दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात झाले.
Latest Marathi News अवकाळी पावसामुळे जनावरांचा चारा भिजला Brought to You By : Bharat Live News Media.