जागा आमची; तुमची शिरजोरी चालणार नाही
नगर : पुढारी वृत्त्तसेवा : शिक्षक बँकेच्या इमारतीतील पोस्ट ऑफीस संबंधित अधिकार्यांनी रिकामे करावे, या मागणीसाठी काल शिक्षक बँकेच्या वतीनेे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार यांनी संयुक्तपणे पोस्टासमोर धरणे आंदोलन करून काही काळ कामकाज बंद पाडले. यावेळी पोस्ट प्रशासनाकडून अरेरावीची भाषा वापरताच बापूसाहेब तांबे यांनी जागा आमची आहे, तुमची शिरजोरी चालणार नाही, अशी तंबीच भरली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल स्वाती दळवी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आगामी दोन महिन्यांमध्ये सदरची जागा रिकामी करण्याबाबत पाऊले उचलली जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिक्षक बँकेच्या इमारतीत 1973 पासून या भागातील गरज म्हणून सदर पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले होते. पुढे पोस्ट ऑफिसचे भाडे कमी असल्याने बँकेने कोर्टात केस दाखल केली. 2007 साली या केसचा निकाल लागला. त्यावेळी कोर्टाने भाडे वाढवून द्या, असे पोस्टला सांगितले तर शिक्षक बँकेने आम्हाला भाडे नको जागा रिकामी करा, असा आग्रह धरला. त्यानंतर गेली अनेक वर्षे हा विषय प्रलंबित आहे. मात्र बँकेच्या संचालक मंडळाने मागील चार-पाच वर्षापासून याबाबत पोस्टाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सदर जागा रिकामी करण्याबाबत आपली भूमिका मांडली.
पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी देखील त्याला प्रतिसाद देऊ शहरांमध्ये इतर ठिकाणी पर्याय जागा शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत पोस्ट खात्याने अनेक वेळा वृत्तपत्रात जाहिराती सुद्धा दिल्या आहेत. परंतु यातून मार्ग निघत नसल्याने व सदर जागा बँकेसाठी अपुरी पडत असल्याने नाईलाजाने आज बँकेतर्फे पोस्टाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली सदिच्छा मंडळ, शिक्षक भारती, ऐक्य मंडळ, परिवर्तन मंच आघाडी व एकल मंचचे सर्व सदस्य, पदाधिकारी, बँकेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी तसेच ठेवीदार व सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अहमदनगरचे डाक अधीक्षक बनसोडे यांच्याशी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अरेरावीची भूमिका घेतल्याने बापूसाहेब तांबे यांनी आज आम्ही पोस्टाचे कामकाज बंद पाडणार तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा. आमची जागा असताना आमच्यावर शिरजोरी चालणार नाही, असा ईशारा दिला. त्यानंतर पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती दळवी यांनी प्रत्यक्ष तांबे यांच्याशी चर्चा केली तसेच पोस्टाच्या अधिकार्यांशी चर्चा केली व सात दिवसाच्या आत वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बँकेच्या पदाधिकार्यांची बैठक लावून पुढील दोन महिन्यांमध्ये जागा रिकामी करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी शिक्षक संघ व मंडळाचे पदाधिकारी बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे, विद्याताई आढाव, गोकुळ कळमकर, राजकुमार साळवे, बाळासाहेब कदम, रविंद्र पिंपळे, राजेंद्र विधाते, वृषाली कडलग, अर्जुन शिरसाठ, सुरेश निवडूंगे, राजू राहणे, सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे, किसन खेमनर, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, बँकेचे चेअरमन संदीप मोटे, रामेश्वर चोपडे, व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, संचालक बाळासाहेब सरोदे, रमेश गोरे, भाऊराव राहिंज,बाळासाहेब तापकीर, कारभारी बाबर, शशी जेजुरकर, माणिक कदम, योगेश वाघमारे, अण्णासाहेब आभाळे, गोरक्षनाथ विटनोर, शिवाजी कराड, सूर्यकांत काळे, संतोष राऊत, कल्याण लवांडे, ज्ञानेश्वर शिरसाट, सरस्वती घुले, गीता बाप्ते, वनिता सुंबे, मनीषा गाढवे, सुवर्णा राठोड, जयेश गायकवाड, शरद वांढेकर विकास मंडळाचे विलास गवळी, प्रदीप दळवी, संतोष मगर, शेंडगे, आंबेकर, आबा दळवी, कैलास चिंधे, बाबा आव्हाड, भास्कर कराळे, राजेंद्र निमसे, भीमराव चाचर, सुखदेव आरोळे, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
The post जागा आमची; तुमची शिरजोरी चालणार नाही appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्त्तसेवा : शिक्षक बँकेच्या इमारतीतील पोस्ट ऑफीस संबंधित अधिकार्यांनी रिकामे करावे, या मागणीसाठी काल शिक्षक बँकेच्या वतीनेे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार यांनी संयुक्तपणे पोस्टासमोर धरणे आंदोलन करून काही काळ कामकाज बंद पाडले. यावेळी पोस्ट प्रशासनाकडून अरेरावीची भाषा वापरताच बापूसाहेब तांबे यांनी जागा आमची आहे, तुमची शिरजोरी चालणार नाही, अशी तंबीच भरली. त्यानंतर …
The post जागा आमची; तुमची शिरजोरी चालणार नाही appeared first on पुढारी.