परभणी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक : राहुल लोणीकर
परतूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पक्षाने संधी दिल्यास परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले.
माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी बुधवारी (दि.१०) दर्पण दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सत्कार केला. यावेळी बोलताना राहुल लोणीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. राहुल लोणीकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणीतून निश्चितच उमेदवारी मिळेल असा विश्वास लोणीकर समर्थक व्यक्त करतात.
राहुल लोणीकर बोलतांना पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आगामी लोकसभा निवडणुकीत संधी दिली तर परभणीतून आपण निश्चितच निवडणूक लढवू. परभणी शहरासह संपुर्ण मतदारसंघात आपला चांगला जनसंपर्क असून यापूर्वीच्या अनेक निवडणुकीमध्ये माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली काम केल्याचा अनुभव असल्याचे ते म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघातील विविध समस्यांची जाणीव आपणाला आहे. गावपातळीवरील सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान राहुल लोणीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात काय हालचाली होतात याकडे विशेषतः राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे. यावेळी माजीमंत्री बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांनी शहरातील पत्रकारांचा सत्कार केला. याप्रसंगी भगवान मोरे, द.या.काटे, शत्रुघ्न कणसे, संपत टकले, संभाजी वारे इतरांची उपस्थिती होती.
परतूर विधानसभा मतदार संघात खासदाराने फक्त जनतेला धोंडे खाऊ घातले. परतूर मंठा मतदार संघात तुरळक एक दोन कामे सोडले तर कुठकुठ निधी दिला हे त्यांनी जाहीर करावं. फक्त पाच वर्षांनी धोंडे जेवण देऊन जनतेला धोंडे खाऊ घातले मात्र या पलीकडे मोठ्या विकास कामासाठी कोणतेही लक्ष दिले नाही. आणि निधी दिला नाही. असे म्हणत नाव न घेता खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर राहुल लोणीकर यांनी टोला लगावला आहे.
Latest Marathi News परभणी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक : राहुल लोणीकर Brought to You By : Bharat Live News Media.