नख लागले… नरडीला!
विठ्ठल हेंद्रे
गुन्हेगार कितीही चलाख असला, हुशार असला तरी कोणती ना कोणती चूक त्याच्या हातून कळत-नकळतपणे होतेच. आरोपीने केलेली ही चूकच पोलिसांना अनेकवेळा गुन्ह्याच्या मुळापर्यंत घेऊन जाते. असाच एक गुन्हा घडला होता; पण त्याची पाळेमुळे काही मिळून येत नव्हती. मुंबई पोलिसांनी या किचकट गुन्ह्याची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उकल केली. त्याची ही कहाणी… (Crime News)
मुंबईच्या भायखळा परिसरातील जवळपास पंचवीस मजली रहिवासी बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये शंभरहून अधिक कुटुंबे राहत होती. त्यांपैकीच सतराव्या मजल्यावर राहणारे मानवीचे एक कुटुंब… मानवी ही सुंदर, गोड आणि निरागस अशी अवघ्या पाच वर्षांची गोजिरवाणी चिमुरडी. आताच ती कुठे ज्युनिअर केजीमध्ये जाऊ लागली होती. त्यामुळे दररोज सकाळी तिला शाळेत सोडण्यासाठी कधी तिच्या आईची, तर कधी वडिलांची तारांबळ उडायची. नेमकं शाळेची आवराआवरी करायच्या वेळेस मानवी धूम ठोकायची. कधी गॅलरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत सुटायची, तर कधी कुठेतरी लपून बसायची. त्यामुळे दररोज सकाळी मानवी आणि तिच्या आई-वडिलांचा हा लपंडाव आणि पकडापकडी ठरलेली असायची.
अमानवी कृत्य!
2016 साल होते. नेहमीप्रमाणे मानवी आणि तिच्या वडिलांची तारांबळ सुरूच होती. मानवीची गॅलरीतच पळापळ चालू होती आणि तिचे वडील तिच्या शाळेच्या आवराआवरीत गुंतले होते. अचानक मानवी दिसायची बंद झाली आणि तिचा आवाजही येईना म्हणून तिचे वडील फ्लॅटबाहेर आले तर मानवी कुठेच दिसून येत नव्हती. अचानक इमारतीच्या खालून लोकांचा गलका ऐकायला आला म्हणून मानवीच्या वडिलांनी खाली पाहिले आणि समोरचे द़ृश्य बघून त्यांनी एकच हंबरडा फोडला. इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून कोसळून मानवी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाली होती. पाच मिनिटांपूर्वी हसत-बागडत असलेल्या मानवीचा मृतदेह बघून तिच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता. (Crime News)
संशयाची सुई!
काही वेळातच भायखळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात झाली. मानवी जिथून खाली पडली, त्या गच्चीची उंची आणि मानवीची उंची विचारात घेता मानवी तोल जाऊन पडणे किंवा ती स्वत:हून उडी मारणे शक्यच नाही, हे पोलिस अधिकारी नंदकुमार गोपाळे व उपस्थित पोलिसांनी ओळखले. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्या मजल्यावर मानवीच्या कुटुंबासमवेत आणखी दोन कुटुंबे राहत होती; पण या तीन कुटुंबांत अजिबात सख्य नव्हते. त्यामुळे मानवीच्या आई-वडिलांनी साहजिकच या दोन कुटुंबांवर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठांना सांगून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्याचा निर्णय घेतला. फॉरेन्सिक पथक आल्यानंतर ज्यांच्यावर आरोप होता, त्या दोन कुटुंबांतील महिलांचे नेल क्लिपिंग नमुने घेण्यात आले. (नेल क्लिपिंग म्हणजे नखांच्या अवशेषांचे नमुने. गुन्हा करताना आरोपीच्या नखांमध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित काही अंश आढळून आल्यास तो तपासाच्या द़ृष्टिकोनातून कामी येतो.) घटना घडून दोन दिवस उलटले होते; पण पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले नव्हते. दुसरीकडे वरिष्ठांकडून सारखा तगादा सुरू होताच. चिमुरडी मानवी पडली की तिचा खून झाला, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्या इमारतीतील संशयितांसह अनेकांचे जबाब नोंदविले; पण काहीच सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी मुलीची उंची, तिचे वजन यावरून प्रतीकात्मक बाहुली तयार केली. इमारतीमध्ये जाऊन गॅलरीतून ती बाहुली खाली टाकून देत अंदाज घेण्यास सुरुवात केली. बाहुलीची प्रतिकृती ज्या दिशेने पडत होती, त्यावरून मुलीला ढकलून देऊन तिचा खूनच झाला असल्याचे समोर येत होते; मात्र सबळ पुरावे नव्हते. आठ दिवसांनंतरही चिमुकलीचे नेमके काय झाले, हा प्रश्न अनुत्तरितच होता. (Crime News)
घटनेदिवशी मोकळ्या पोर्चमध्ये रेखा केस विंचरत थांबली होती. यावेळी मानवीही फ्लॅटच्या पोर्चमध्ये खेळत होती. तिचे वडील तिला शाळेत पाठवण्यासाठी लगबग करत होते. मानवी शाळेत जायचे नाही म्हणून फ्लॅटच्या समोरील पोर्चमध्ये लपत होती, पळत होती, ओरडत होती. यावेळी ती महिला मानवीला ओरडू नको म्हणत होती; मात्र मानवी अजाण होती. या घटनेमुळे तिला कमालीचा राग आला. तसेच तिच्या आई-वडिलांशी झालेल्या भांडणाचा रागही तिला आठवला. अवघ्या काही क्षणांत मानवी गॅलरीकडे असल्याचे पाहून व इतर कोणी तेथे नसल्याचे पाहून रेखाने तिला उचलून सतराव्या मजल्यावरून खाली फेकून दिले.
पुरावेच आले समोर!
या कृत्यानंतर आपण काही केलेच नाही, या आविर्भावात ती वावरत होती. ही सर्व घटना घडत असताना मानवीला तिने उचलताना, तसेच गॅलरीतून खाली फेकून देताना मानवीने तिचा प्रतिकार केला. यातून मानवीच्या कपड्याचा व त्वचेचा काही अंश रेखाच्या नखांमध्ये राहिला होता. घटनेच्या दिवशी पहिल्या दोन तासांत पोलिसांनी संशयितांचे नेल क्लिपिंगचे नमुने घेतले होते. त्यामध्ये रेखाचा सहभाग असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आणि खुनाला वाचा फुटली. मानवीच्या खुनानंतर रेखा जणू काही घडलेच नाही, आपला काही संबंध नाही अशा आविर्भावात वावरत होती; पण तिच्याच नखात तिच्या कुकर्माचे पुरावे लपून बसले होते आणि त्यांनीच रेखाच्या नरडीला नख लावण्याचे काम केले.
अखेर बिंग फुटलेच!
तब्बल बारा दिवसांनंतर फॉरेन्सिकचा अहवाल आला. हा अहवाल या सर्व प्रकरणाच्या तपासाच्या दिशेला कलाटणी देणारा ठरला. नेल क्लिपिंगच्या रिपोर्टमधील एका नमुन्याचा रिपोर्ट रेखा नावाच्या शेजारणीच्या नखांशी जळून आला होता. अहवाल येताच पोलिसांनी रेखाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली. रेखा ही मुळातच भांडकुदळ बाई होती, त्यामुळे त्या इमारतीतील कुणाशीही तिचे सख्य नव्हते. तिच्या या स्वभावामुळे तिचा नवरासुद्धा तिच्यापासून वेगळा राहत होता. तशातच दोन वर्षांपूर्वी रेखाच्या लहान मुलाचा आजारी पडून मृत्यू झाल्याने ती एकाकी झाली होती. या एकाकीपणामुळे तिच्या मनात समाज आणि लहान मुलांबद्दल कमालीचा चिडचिडेपणा आला होता.
हेही वाचा :
Ayodhya Ram Mandir Inauguration : भाविकांसाठी अयोध्येत असणार लक्ष्मणरेषा..!
Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी गोळ्या झेललेल्या संतोष दुबेंचे स्वप्न पूर्ण
Ayodhya Ram Mandir Inauguration : मंत्र्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत; PM मोदींचा सल्ला
Latest Marathi News नख लागले… नरडीला! Brought to You By : Bharat Live News Media.