हिवाळ्यात पावसाळा ! नगर तालुक्यात 23.5 हेक्टर पिकांचे नुकसान
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने नगर तालुक्यातील 23.5 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी आणि तूर पिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका 41 शेतकर्यांना बसला आहे. दरम्यान, मंगळवारी देखील जिल्ह्यात दिवसभर अवकाळी पावसाने संततधार सुरू होती. या पावसामुळे काही ठिकाणी ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी पाऊस पिकांना लाभदायक ठरला. दरम्यान, हवामान विभागाने 13 जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रब्बी पिके अडचणीत येण्याची शक्यता होती. परंतु गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बीचे आवर्तन पुढे ढकलण्यात आले होते.
काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाकडे 17 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मागविला आहे. अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी झालेल्या पावसाने नगर तालुक्यातील घोसपुरी आणि खंडाळा या दोन गावांतील 23.5 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी व तूर या दोन पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यामध्ये घोसपुरी गावातील 17 हेक्टर तर खंडाळा येथील 6.5 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. 41 बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लवकरच शासनाला अहवाल पाठविला जाणार आहे.
दिवसभर संततधार…
मंगळवारी (दि. 9) सकाळी 11 पासून नगर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सुरू असलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळित केले. कधी जोरदार, तर कधी मध्यम पावसानेे काही भागात पाणी साचले होते. शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात गारठा पसरला होता. जिल्ह्यातील काही भागातदेखील पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ज्वारीवर चिकटा तर हरभरा पिकावर घाटी अळी, तर कांद्यावर करपा रोग पडण्याची शक्यता आहे.
Latest Marathi News हिवाळ्यात पावसाळा ! नगर तालुक्यात 23.5 हेक्टर पिकांचे नुकसान Brought to You By : Bharat Live News Media.