छत्रपती संभाजीनगर : तीन मित्रांनी चोरल्या 80 सायकली
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : तीन अल्पवयीन मित्रांनी वर्षभरात शहरातील विविध भागांतून महागड्या 80 सायकली चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवाहरनगर पोलिसांनी दोघांना पकडून 4 ते 70 हजार रुपयांपर्यंतच्या तब्बल 63 सायकली जप्त केल्या आहेत. आणखी 17 ते 18 सायकली जप्त करणे बाकी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी मंगळवारी (दि. 9) दिली. ( Bicycles Theft )
संबंधित बातम्या
Nashik News : जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’
बारामतीत बालकुमार साहित्य संमेलन ; संमेलनाध्यक्षपदी स्वाती राजे
Jalgaon Bribe News : जळगावात वायरमन, अमळनेरात हवालदार एसीबीच्या जाळ्यात
अधिक माहितीनुसार, जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील उल्कानगरी भागातून सायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. याशिवाय, उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील ज्योतीनगरमधूनही अनेक सायकली चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या होत्या. दरम्यान, या सायकली चोरणारी तीनपैकी दोन अल्पवयीन मुले इंदिरानगरातील एमएसईबी कार्यालयाजवळ, मोकळ्या मैदानात बसलेली असल्याची माहिती विशेष पथकाचे सहायक निरीक्षक डी. एम. चंदन यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक केंद्रे यांना याबाबत माहिती दिली.
त्यावर चंदन यांच्यासह सहायक फौजदार गजेंद्र शिंगाणे, शोन पवार, संदीप क्षीरसागर, जावेद पठाण, राजेश चव्हाण, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, विजय सुरे यांच्या पथकाने मैदानावर जाऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केल्यावर तिघांनी मिळून सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 6 लाख 59 हजार रुपयांच्या 63 सायकली जप्त केल्या आहेत. ही कामगिरी उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
लॉक नसलेल्या सायकल चोरायचे
तिघेही 15 ते 17 वर्षे वयोगटातील आहेत. अल्पवयीन असल्यामुळे लगेचच त्यांच्यावर कोणाला संशय यायचा नाही. ते भरदिवसा हायफाय परिसरात फिरायचे. कुलूप नसलेली सायकल दिसली, की नजर ठेवून ती लंपास करायचे. चोरलेली सायकल ते वाळूज, साजापूर भागात घेऊन जायचे. एक हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत सायकली विक्री करून पैसे आले, की मौजमजा करायचे. एक-एक करीत वर्षभरात त्यांनी तब्बल 80 सायकली लंपास केल्याचे समोर आले आहे, असे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले.
बीएमडब्लू कंपनीची सायकलही चोरली
तिन्ही अल्पवयीन मुले पूर्वी वाळूज एमआयडीसीतील साजापूर-स्वास्तिकनगर भागात राहायची. तेथेच त्यांची ओळख झाली होती. त्यांतील एकाचे कुटुंबीय रमानगर, क्रांतीनगर भागात राहायला आले. तिघांचेही पालक मजुरी करणारे आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी एक सायकल चोरली. ती दीड हजार रुपयांत विक्री केली. पैसे मिळत असल्याचे लक्षात आल्यावर तिघांनीही सायकल चोरण्याचा सपाटा लावला. उल्कानगरी, ज्योतीनगर भागातून त्यांनी भरदिवसा या सायकली चोरल्या आहेत. 70 हजार रुपये किंमत असलेली बीएमडब्लू कंपनीची सायकलही चोरल्याचे समोर आले. ( Bicycles Theft )
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : तीन मित्रांनी चोरल्या 80 सायकली Brought to You By : Bharat Live News Media.