बारामतीत बालकुमार साहित्य संमेलन
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पाचवे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन बारामती येथे रंगणार आहे. नटराज नाट्य कला मंडळ (बारामती) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखेच्या सहकार्याने 20 आणि 21 जानेवारी रोजी हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (दि. 20) सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे संमेलन बारामती येथील नटराज नाट्य कला मंदिरात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, किरण केंद्रे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुकुमार कोठारी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. 20) सकाळी आठ वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर होणार्या मुलांच्या वाचन चळवळीसाठी समाजाची भूमिका या विषयावरील परिसंवादात एकनाथ आव्हाड, मेधा इनामदार, रमेश पिटले, प्रा. प्रदीप देशमुख, रामदास केदार यांचा सहभाग असेल. याशिवाय मुलांसाठी कथाकथन, महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम, बालकुमार काव्यसंमेलन, अलबत्या गलबत्या हे बालनाट्याचे सादरीकरण होईल.
रविवारी (दि. 21) सकाळी नऊ वाजता सुंदर माझी शाळा बालगीत सादरीकरण होणार असून, त्यानंतर होणार्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात अंजली कुलकर्णी, बाळकृष्ण बाचल, बबन शिंदे, मीरा शिंदे, सचिन भेंडभर यांचा सहभाग असेल. यानंतर कविसंमेलन रंगणार आहे. ’मला आवडलेले पुस्तक’ या बालकुमार परिसंवादात 6 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर बाकलाकार शर्व गाडगीळ हा प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. सायंकाळी चार वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.
Latest Marathi News बारामतीत बालकुमार साहित्य संमेलन Brought to You By : Bharat Live News Media.