पोलिस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणारा राजस्थानात गजाआड

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याच्या पोलिस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणार्याच्या मुसक्या रत्नागिरी पोलिसांकडून राजस्थानच्या मलिपूर येथील सीमाभागातील परिसरातून आवळण्यात आल्या. झाकीर असे या संशयिताचे नाव असून, तो राजस्थानच्या मेवाड येथील रहिवासी आहे. झाकीर याने अनेकांची बँक खाती हॅक करून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आह़े
रत्नागिरी पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेकडून झाकीर याचा शोध घेऊन अटक करण्यात आली आह़े त्याच्याकडून पोलिसांनी अनेक मोबाईल, सीमकार्ड हस्तगत केली आहेत. झाकीर याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तो गोवर्धन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. झाकीरचे लोकेशन ट्रेस करत असलेल्या पोलिसांना तो वारंवार हुलकावणी देत होता. उत्तर प्रदेश येथे पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच तो गोवर्धन परिसरातून निसटला. पोलिसांची अटक टाळण्यासाठी तो थेट राजस्थानमधील सीमावर्ती भागामध्ये वास्तव्यासाठी गेला होता. रत्नागिरी सायबर सेलचे उपनिरीक्षक योगेश खरे यांनी अखेर झाकीर याचे राजस्थानमधील लोकेशन शोधले. त्यानुसार खरे यांनी राजस्थान दिग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांकडून आपला शोध घेतला जात असल्याची कुणकुण लागलेला झाकीर हा त्याच परिसरात लपून बसला होता. राजस्थान पोलिसांचे पथक व रत्नागिरी सायबर सेल यांच्याकडून दिग परिसरात सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आल़े कडाक्याच्या शून्य अंश सेल्सिअस तापमानातदेखील पोलिसांकडून शोध घेण्याचे काम करण्यात येत होते. 10 दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर मलिपूर या परिसरातून झाकीर याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
Latest Marathi News पोलिस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणारा राजस्थानात गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.
