न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, आम्ही जे काही केले ते कायद्याच्या अधीन राहून केले आहे. त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सव नेत्रदीपक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि.९) भुसे यांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अपात्रतेबाबत निकाल देण्यासाठी बुधवारी (दि.१०) अंतिम मुदत आहे. त्याकडे भुसे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही कायद्याच्या अधीन राहून सर्व निर्णय घेतल्याने आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
नाशिकमध्ये १२ तारखेला आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवदिनी स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे भुसे यांनी सांगितले. दरम्यान, श्री काळाराम मंदिरात २२ तारखेला उद्धव ठाकरे हे महाआरती करणार आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी अधिकचे भाष्य करणे टाळले.
कारवाईमागे दबाव नाही : भुसे
आमदार रवींद्र वायकर यांच्यावर दबावाच्या राजकारणातून ‘ईडी’चे छापासत्र झाल्याचा आरोप भुसे यांनी खोडून काढला. ईडी कोणावरही थेट कारवाई करत नाही. महिनोन्महिने चौकशी होते. त्यात कोठेही संशय आढळून आल्यास कारवाई करते. तेव्हा वायकर यांनी वस्तुस्थिती ‘ईडी’पुढे मांडावी, असा सल्लाही भुसे यांनी दिला.
हेही वाचा :
रत्नागिरी : अवकाळीने बागायतदार धास्तावले
Shiv Sena MLAs’ disqualification verdict: पात्र-अपात्र कोण? फैसला आज; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
‘मविआ’चे जागावाटपावर शिक्कामोर्तब?
Latest Marathi News न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे Brought to You By : Bharat Live News Media.