शौर्य दिनी पानीपतमध्ये जागवल्या जाणार मराठ्यांच्या शौर्यगाथा
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : हरियाणातील पानीपत युद्धाला १४ जानेवारी २०२३ ला २६३ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्ध्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. विविध कार्यक्रम या निमित्ताने पानीपतमध्ये होणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, नागरी उड्ड्यन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेते विनोद तावडे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
शौर्य स्मारक समितीचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, १४ जानेवारीला पानिपतचे युद्ध झाले होते. मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात हे युद्ध झाले होते. अनेक लोकांनी या युद्धात आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या युद्धाला १४ जानेवारीला २६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हरियाणासह देशातील १०-१२ राज्यातूनही लोक कार्यक्रमाला येणार आहेत.
शौर्य स्मारक समितीतर्फे बनवण्यात येत असलेल्या स्मारकाला आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी इंडियन ऑईल कडून २० कोटींचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ते स्मारक पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र सरकार कडून आम्हाला अपेक्षा आहेत. पानिपतच्या स्मारकावर लक्ष देणे ही महाराष्ट्र शासनाचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
Latest Marathi News शौर्य दिनी पानीपतमध्ये जागवल्या जाणार मराठ्यांच्या शौर्यगाथा Brought to You By : Bharat Live News Media.