‘एनडीए’ला 400 पेक्षा जास्त जागा मिळणार : केंद्रीयमंत्री रामदास आठवले
पणजी; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारने चांगले काम केले आहे. देशाचा सर्वांगिण विकास करताना तळागाळातील लोकांना अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
सोमवारी (दि. ८) पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आठवले बोलत होते. यावेळी आरपीआय गोवाचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, गोवा संयोजक सतीश कोरगावकर, कार्याध्यक्ष उमेश हसापूरकर, संजय कदम व हेमंत रणपीसे उपस्थित होते.
ते म्हणाले, आरपीआयचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मात्र, ज्या मराठ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे त्याच मराठ्यांना आरक्षण मिळावे. तामिळनाडूमध्ये 79 टक्के पर्यंत आरक्षण आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळावे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जावे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने अनुसूचित जाती व जमातीसाठी सुमारे तीन लाख कोटीचे बजेट उपलब्ध केल्याचे आठवले म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे चांगले काम करत असल्याचे सांगून दुहेरी नागरिकत्वाचा विषय नियमानुसार सुटावा, असेही ते म्हणाले.
जातीनिहाय जनगणननेला अडथळा
सत्तर वर्षे सत्तेत असतानाही जातिनिहाय जनगणना न करणारे आता जातींच्या गोष्टी करत आहेत. कलम 72 मध्ये जाती नष्ट झाल्याचे म्हटले आहे. त्याचा अडथळा जातिनिहाय जनगणनेला येईल, असे आठवले म्हणाले.
Latest Marathi News ‘एनडीए’ला 400 पेक्षा जास्त जागा मिळणार : केंद्रीयमंत्री रामदास आठवले Brought to You By : Bharat Live News Media.