न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळेल?
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ‘न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळणार ?, असा सवाल करत या देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर स्वरूपाला जाऊन पोहोचली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे’, अशी घणाघाती टीका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
येत्या २२ व २३ जानेवारी रोजी नाशकात होऊ घातलेल्या ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी नार्वेकर व मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ज्या न्यायमूर्तींवर न्याय देण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपावली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो. आरोपीसोबत चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो. देशाची न्यायव्यवस्था बिकट झाली आहे, अशी टीका करत राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या कृतीवरही प्रश्न उपस्थित केला. (Sanjay Raut)
लोकसभेबाबत आमच्या चर्चा मुंबईत होतात. पण काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना दिल्लीत जाव लागत असे सांगत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांडही दिल्लीत असल्याचा टोला राऊतांनी यावेळी लगावला. शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने ४८ जागा लढवाव्या, त्यांना त्यांची जागा कळेल, अशी टिकाही त्यांनी केली. तलाठी भरती प्रकरणावरूनही राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. उद्धव ठाकरेंवरील टीकेवरून राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, फडणवीस यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधेलला आहे. मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे. असा आजार कुणालाही होऊ शकतो. अमित शाह देखील आजारी असतात. नरेंद्र आजारी पडू शकतात. पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीच्या पट्टा आहे. तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलाय. दिल्ली त्यांना खेळवत बसलीये, असा टोलाही राऊत यांनी लगावला. (Sanjay Raut)
अकोला प्रकाश आंबेडकरांनी लढवावी
वंचितसुध्दा महाविकास आघाडीचा घटक असल्याचे नमूद करत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अकोल्याची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकर लढतात आणि ती जागा आंबेडकरांनीच लढावी, यावर महाविकास आघाडीचं एकमत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर ‘संक्रांत’
KGF स्टार यशच्या वाढदिनी बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने ३ ठार, ३ जखमी
Amravati News : अंगणवाडी सेविका आक्रमक, जि.प. समोर ठिय्या आंदोलन
Latest Marathi News न्यायमूर्तीच आरोपीला बंद दाराआड भेटत असेल तर न्याय कसा मिळेल? Brought to You By : Bharat Live News Media.