Nagar : कर्जतमध्ये अपघात सुरक्षा योजनेचे 28 पैकी 22 प्रस्ताव मंजूर
कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असून, 28 पैकी 22 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे गोरगरीब शेतकर्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांनी दिली. राज्यात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणे, अनावश्यक त्रूटी काढून विमा नाकारणे, यामुळे ती पुरेशी यशस्वी होत नव्हती. हे पाहून राज्य सरकारने या योजनेत सुधारणा केली आणि आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.
एप्रिल 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नावावर जमीन असणारे सर्व शेतकरी पात्र आहेत. ज्यांचे सातबारावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, अशा कुटुंबातील कोणतीही एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेत अर्जदार हा 10 ते 75 वयोगटातील असावा, असा निकष आहे. या योजनेत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकर्याचे वारस म्हणून गाव नमुना, वयाचा पुरावा, एफआयआर प्रत, पोलिस पंचनामा किंवा पोलिस पाटलांचा अहवाल, वारसदारांचे आधार कार्ड आणि पासबुक, अशी कागदपत्र या योजनेमध्ये लागतात.
कर्जत तालुक्यामध्ये आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी एकूण 28 प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी 22 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या कमिटीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्यासह तहसीलदार, पोलिस प्रशासन, आरटीओ हे सदस्य आहेत. समितीसमोर आलेल्या अर्जांची पडताळणी करून, त्यानंतर त्यांना शासनाच्या या विशेष योजनेचा लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांनी दिली.
अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखांची मदत
शेतकर्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबास या योजनेतून 2 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. अपघातात दोन अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये, एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, एक लाख रूपये मदत केली जाते.
अशा प्रकारचे मृत्यू योजनेसाठी पात्र
या योजनेत रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसून अपघात, वीज पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प किंवा विंचूदंश व जनावरांच्या हल्ल्यामुळे दुखापत किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगलीतील मृत्यू, हे सर्व या योजनेसाठी पात्र आहेत.
Latest Marathi News Nagar : कर्जतमध्ये अपघात सुरक्षा योजनेचे 28 पैकी 22 प्रस्ताव मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.