सिंहगड पायी मार्गाने उतरताना महिला गिर्यारोहक गंभीर जखमी

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी (दि. 7) सिंहगड, राजगड, तोरणा किल्ल्यांसह खडकवासला धरण परिसरात पर्यटकांची अलोट गर्दी उसळली होती. दुपारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी धाव घेतल्याने वाहतूक कोलमडली. शनिवारी (दि. 6) सिंहगडाच्या अतकरवाडी पायी मार्गाने उतरताना गंभीर जखमी झालेल्या महिला गिर्यारोहकाला वन विभागाच्या पथकाच्या तत्परतेने वेळेवर उपचार मिळाले. सिंहगडावर सकाळपासून पर्यटकांची वर्दळ सुरू होती. दुपारनंतर घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. दिवसभरात दीड हजारांवर वाहने गडावर गेली. खाजगी प्रवासी व गडावरील विक्रेत्यांच्या वाहनांचीही गर्दी वाढली होती. त्यामुळे गडावरील वाहनतळ फुल्ल होऊन थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.
डोणजे गोळेवाडी व कोंढापुर फाट्यावरील नाक्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, बळिराम वाईकर, संदीप कोळी यांच्यासह सुरक्षा रक्षक सायंकाळी उशिरापर्यंत धावपळ करत होते. सिंहगडावरुन उतरताना अनया धारणे यांच्या पायाला दुखापत झाली. याची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी पाटील यांनी स्ट्रेचरसह वनरक्षक संदीप कोळी व सुरक्षा रक्षकांचे पथक घटनास्थळी पाठवले. वनसमितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर, रमेश खामकर,अनिल जोरकर, धनराज सांबरे, गणेश सांबरे, रेखा मिसाळ, निलेश सांगळे आदी दाखल झाले. जखमी धारणे यांना स्ट्रेचरवरुन खाली आणले. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक नियोजन केल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली नाही. घाटरस्त्यावर वाहने उभी करू नयेत, यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले होते.
-समाधान पाटील, वन परिमंडलाधिकारी
राजगड तरुणाईने बहरला
राजगड किल्ल्यावर दिवसभरात दहा ते बारा हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. यात तरुणांची संख्या अधिक होती. गडाच्या सुवेळा, संजीवनी माचीसह राजसदरेचा परिसर तरुणाईने बहरून गेला होता.
Latest Marathi News सिंहगड पायी मार्गाने उतरताना महिला गिर्यारोहक गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
