Fraud case : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष; दुबईत संचालकाला अटक
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बिटकॉईन या आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणात गुजरात पोलिसांनी दुबईतील बिटसोलाव्हाईज या कंपनीच्या संचालकाला अटक केली होती. आता पुण्यातील फसवणूक प्रकरणात त्या संचालकाला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. कमलेशभाई प्रशांतकुमार ब्रम्हभट (वय 34, सध्या रा. न्डालूस प्लाझा, दुबई, मूळ रा. मकरपूरा, बडोदा, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फसवणूक प्रकरणात यापूर्वी गणेश शिवकुमार सागर (वय 47, रा. द्वारका, नवी दिल्ली) याला अटक केली होती. आरोपी कमलेश आणि गणेश यांनी आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याला अटक केली असून, न्यायालयाने 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे- पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक प्रमोद खरात, संदेश कर्णे, राजेश केदारी, अश्विनी कुमकर, प्रवीणसिंग राजपूत, वैभव माने यांनी ही कारवाई केली.
पुण्यातील सात जणांची फसवणूक
पुण्यासह देशभरातील गुंतवणुकदारांची त्यांनी मोठ्या रकमेची फसवणूक केली होती. कमलेशने दुबईतील बिटसोलाव्हाईज प्रा. लि. कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. फसवणूक प्रकरणात गुजरात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमलेशला अटक केली होती. तो सध्या सुरतमधील लाजपोर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पुण्यातील फसवणूक प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने कमलेशला सूरतमधील कारागृहातून ताब्यात घेतले. तपासात आरोपींनी सात जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाली असल्यास तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
Latest Marathi News Fraud case : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष; दुबईत संचालकाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.